पिंपरी : मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि कन्व्हेंन्शन सेंटरअंतर्गत विकसित केलेल्या खुल्या प्रदर्शन केंद्राच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) उत्पन्न सुरू झाले आहे. येथे नुकत्याच झालेल्या किसान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून भाडे रकमेपोटी 64 लाख रुपयांचे उत्पन्न पीएमआरडीएच्या तिजोरीत जमा झाले आहे.
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या खुल्या प्रदर्शन केंद्राच्या उभारणीस सुरुवात झाली होती. 2020 मध्येच त्याचे काम पूर्ण झाले. या केंद्राच्या जागेत आत्तापर्यंत दोन ते तीन प्रदर्शन भरविण्यात अले आहेत. हे काम 20 हेक्टर जागेत करण्यात आलेले आहे. त्यासाठी जागेचे सपाटीकरण, अंतर्गत रस्त्यांचा विकास, मुख्य प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय आदी सुविधा येथे देण्यात आलेल्या आहेत.
केंद्रासाठी ऑपरेटर नेमण्याचा प्रस्ताव मागे
हे खुले प्रदर्शन केंद्र सुरुवातीला ऑपरेटर नेमून चालविण्यास देण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, हा प्रस्ताव तूर्तास मागे पडला आहे. त्याऐवजी त्यासाठी व्यावहारिक सल्लागार नियुक्त करून त्यांच्या सल्ल्यानुसार या प्रकल्पाबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
खुल्या प्रदर्शन केंद्रात पुढील वर्षभराच्या कालावधीत प्रदर्शन भरविण्यासाठी पीएमआरडीएकडे विविध संस्थांकडून बुकिंग सुरू झाले आहे. तत्कालीन प्राधिकरणाने ठरविलेल्या दरानेच म्हणजे 16.10 रुपये प्रतिदिन प्रतिचौरस मीटरने त्यासाठी भाडे आकारले जात आहे.
– मनीषा कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए
पीएमआरडीएसाठी उत्पन्नाचा स्त्रोत
मोशीतील खुल्या प्रदर्शन केंद्राच्या जागेत 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत किसान कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या माध्यमातून पीएमआरडीएला भाडे रकमेपोटी 64 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, 12 ते 15 जानेवारीदरम्यान होणार्या कन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पोच्या माध्यमातूनही पीएमआरडीएला भाडे रकमेपोटी 39 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.