पिंपरी : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण देशामध्ये सापडल्याने वैद्यकीय विभागाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेच्या वैद्यकीय विभागाने चार रुग्णालये व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहेत. गेल्या वर्षभरापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये बाधितांची संख्या एक अंकी आहे. मात्र, चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्याच व्हेरियंटचे रुग्ण देशातील काही भागांमध्ये सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. तसेच, येऊ घातलेल्या या नव्या व्हेरियंटला अटकाव करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेत नुकतीच बैठक घेतली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शहरातील सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणार्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच दैनंदिन तपासणीमध्येदेखील वाढ करण्यात येणार आहे.
वायसीएम, जिजामाता, थेरगाव, भोसरी व आकुर्डी रुग्णालयामध्ये बेड तयार ठेवण्यात येणार आहेत. तसेच चारही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रवाही करणार्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. व्हेंटिलेटर तसेच, इतर यंत्रणा सुस्थितीत आहेत. रुग्णांसाठी लागणारा औषधांचा साठा वैद्यकीय विभागाकडे आहे. दैनंदिन अहवालामध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाधितांना क्वारंटाईन करण्याची यंत्रणादेखील सज्ज आहे. नव्या व्हेरियंटला नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी. तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णवाढीच्या वृत्तामुळे नागरिकांकडून डोस घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. पालिकेच्या चारही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टँक व लाईनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय यंत्रणा, औषधे या सर्व गोष्टी मुबलक आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.