शिरूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात शिरूर पोलिस ठाणे हद्दीत आठ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर गुटखा पकडण्यात आला. हा गुटखा म्हणजे एक उदाहरण असून, असा किती गुटखा शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विकला जात असेल, याबाबत अंदाज करणे अवघड असले, तरी यामागे मास्टर माइंड कोण आहे? हे पाहणे गरजेचे आहे.
आज शिरूर शहर व परिसरात आणि तालुक्यातील अनेक भागांत गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. शासनाने यावर बंदी घातली आहे. मात्र, तरीदेखील विविध कंपन्यांचा गुटखा सहज व राजरोसपणे मिळत असेल, तर एक तो शासनाच्या कुठल्या तरी कर्मचार्याच्या आशीर्वादामुळे मिळत असेल, हे नक्की.
गेल्या अनेक वर्षांपासून गुटखाबंदी राज्यात आहे. शिरूर शहरात मात्र गुटखा पुरविणारे काही एजंट कार्यरत असून, काही पोलिस हाताशी धरून आपला व्यवसाय जोमात सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा शिरूर शहरात सुरू आहे. एखादा एजंट सेवा देण्यात कमी पडला, तर त्याच्यावर कारवाई करायची; म्हणजे तो पुन्हा सेवा देण्यात कमी पडत नाही.
मुळात शासनाच्या आदेशाचे पालन होणे महत्त्वाचे आहे की तो नियम स्वतःच्या फायद्यासाठी करणे, अशीच पध्दत सध्या रूढ झाली आहे. एकंदरीत, गुटखाबंदी ही कागदावरच राहली आहे. याचा सर्वाधिक फायदा शासकीय अधिकारी व बेकायदेशीर गुटखा विक्रेते यांना झाला आहे. आज एका दुकानात आठ लाखांचा गुटखा सापडतो, तर अशी मोठी शेकडो दुकाने आहेत. शिरूर शहराचा व परिसराचा झपाट्याने विकास होऊन लोकसंख्या वाढली आहे. त्या गावातील दुकाने असा अंदाज बांधला, तर एकट्या शिरूर पोलिस ठाणे हद्दीत कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर गुटख्याचा व्यवसाय होत असेल. त्यामागे कोण आहे? शासकीय यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे, हे मात्र नक्की.