पिंपरी : सावधान ! पुन्हा गोवर डोकेवर काढतोय ; महिनाभरात वाढले 22 रुग्ण | पुढारी

पिंपरी : सावधान ! पुन्हा गोवर डोकेवर काढतोय ; महिनाभरात वाढले 22 रुग्ण

पिंपरी : गोवरचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला कुदळवाडी परिसरात गोवरची 5 बालकांना लागण झाली होती. त्यानंतर थेरगावमध्येही गोवरचे रुग्ण आढळले आहेत. शहरातील विविध भागांमध्येदेखील सध्या हे रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिनाभरात गोवरचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

शहरामध्ये 20 नोव्हेंबरला सुरुवातीला 3 संशयित रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या वाढून 5 संशयित रुग्ण संख्येपर्यंत जाऊन पोहोचली. 29 नोव्हेंबरला कुदळवाडी येथील 5 जणांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेरगाव परिसरातदेखील गोवरचे 2 रुग्ण आढळले आहेत.

यावर्षी आढळले 432 संशयित रुग्ण

सध्या शहरातील विविध भागांमध्येदेखील गोवरचे रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील गोवरबाधित रुग्णांची संख्या 26 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात नव्याने आढळलेल्या 22 गोवरबाधित बालकांचा समावेश आहे. तर, 4 बालकांना गेल्या वर्षभरात लागण झालेली आहे. शहरामध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे एकूण 432 संशयित रुग्ण आढळले आहेत. शहरात गोवरची रुग्णसंख्या वाढत असल्याने आवश्यक दक्षतेचा भाग म्हणून महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

तीन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

महापालिकेतर्फे सध्या गोवर प्रभावित भागामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत 2 लाख 99 हजार 331 घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. जवळपास 10 लाख 51 हजार 437 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

पाच वर्षांखालील 65 हजार बालकांचे सर्वेक्षण

महापालिकेच्या वतीने 5 वर्षांखालील 65 हजार 604 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, 32 हजार 49 बालकांना ’व्हिटॅमिन ए’ ची मात्रा देण्यात आली आहे. 3 हजार 516 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.

गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो. हा आजार होऊ नये, यासाठी 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी मुलांना पाच वर्ष वयोगटापर्यंत ही लस देता येते. पालकांनी ही लस मुलांना देऊन घ्यावी.
                                  – डॉ. पवन साळवे,  आरोग्य वैद्यकीय अधिकारी

लक्षणे नसली तरी करा लसीकरण

गोवरचे लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच महापालिका दवाखाना आणि रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. साळवे यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button