पौड : ल्युपिन कंपनीतील कामगारांचे आंदोलन; पगारवाढ तसेच सोयी-सुविधांची मागणी

पौड : ल्युपिन कंपनीतील कामगारांचे आंदोलन; पगारवाढ तसेच सोयी-सुविधांची मागणी

पौड; पुढारी वृत्तसेवा : पगारवाढ तसेच कामगारांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नांदे-लवळे (ता. मुळशी) येथे असलेल्या ल्युपिन कंपनीत कामगारांनी धरणे आंदोलन केले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मध्यस्थी करत कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा केली. कंपनी प्रशासनाने एक दिवसाची मुदत मागून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर हे आंदोलन तूर्तास थांबवण्यात आले आहे. ल्युपिन कंपनीमध्ये एकूण 52 कामगार असून युनियनचे 33 कामगार असल्याचे समजते.

संबंधित कामगारांची पगारवाढ करारनामा गेले 18 महिने रखडला आहे. कंपनीत जुन्या व नव्या कामगारांना एकाच श्रेणीचे वेतन असून कंपनी पगारवाढीसाठी जुन्या कामगारांना अधिकची पगारवाढ व नव्या कामगारांना त्यामानाने निम्न पगारवाढ देणार आहे. मात्र कामगारांना समान पगारवाढ हवी आहे. तसेच ही पगारवाढ कामगारांना न्याय देणारी असावी, तुटपुंजी नको अशी कामगारांची आग्रही भूमिका आहे. शिवाय कामगारांच्या इतरही मागण्या कंपनीने मान्य केल्या पाहिजेत, असे कामगारांचे म्हणणे आहे.

त्यासाठी कामगारांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने ते आजच्या दिवस स्थगित करण्यात आले आहे. कंपनी प्रशासन शनिवारी (दि. 24) यावर अंतिम निर्णय सांगणार असून कामगारांनी न्यायाची अपेक्षा केली आहे. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली.

तर कामगारांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, नगरसेवक अमोल बालवडकर, भाजप नेते गणेश कळमकर, माजी उपसभापती विजय केदारी, काँग्रेसचे नेते सुहास भोते, नितीन चांदेरे, विठ्ठल रानवडे, शेखर रानवडे, युनियनचे गोवर्धन बांदल, शिवसेनेचे राम गायकवाड, वैभव पवळे यांनी कंपनीशी चर्चा केली. या वेळी पोलिस निरीक्षक मनोज यादव, पोलिस उपनिरीक्षक विनायक देवकर, पंढरीनाथ कामथे यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता.

कंपनीने 18 महिने रखडवलेला पगारवाढ करारनामा त्वरित केला पाहिजे. पगारवाढ करताना जुने-नवीन कामगारांत दरी निर्माण न करता, समान पगारवाढ करण्यात यावी. तुटपुंजी पगारवाढ न करता कामगारांना महागाईच्या जमान्यात दिलासा देणारी पगारवाढ करावी. कंपनीने 20 वर्षांपूर्वी 52 कामगार काढले होते, त्यातील 36 कामगार टप्प्याटप्प्याने कामावर घेतले आहेत. उरलेले कामगारदेखील त्वरित कामावर रुजू करावेत, ही देखील आग्रही मागणी आहे.
                                                          – गोवर्धन बांदल, युनियन पदाधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news