वेल्हे : दुर्गम 28 शाळांतील विद्यार्थ्यांना एका छताखाली दर्जेदार शिक्षण | पुढारी

वेल्हे : दुर्गम 28 शाळांतील विद्यार्थ्यांना एका छताखाली दर्जेदार शिक्षण

वेल्हे, पुणे; पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्‍यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी यांना एका छताखाली दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पानशेत येथे जानेवारीत मध्यवर्ती प्राथमिक शाळा सुरू होणार आहे. अशा प्रकारची ही राज्यातील पहिली मध्यवर्ती शाळा असून शाळेसाठी सुसज्ज इमारत सज्ज झाली आहे.

धरण भागातील 28 प्राथमिक शाळांतील विद्यार्थी या मध्यवर्ती शाळेत एकाच छताखाली बसून शिक्षण घेणार आहेत. पानशेत धरण खोर्‍यातील अतिदुर्गम खेडी, वाड्या वस्त्यांत कमी पटसंख्येच्या शाळा अधिक आहेत. या भागात दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षक येथे काम करण्यास उत्सुक नसतात. शिक्षक वारंवार गैरहजर राहण्याचे प्रकारही वारंवार घडतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. डोंगरकपारीतील दुर्गम शाळांत कमी पट, कमी शिक्षक, भौतिक सुविधा मिळतात.

पावसाळ्यात अतिवृष्टीत तर अत्यंत हाल विद्यार्थी व शिक्षकांना सोसावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण मिळत नाही, याकडे स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मध्यवर्ती शाळेची संकल्पना प्रत्यक्षात उदयास आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यासाठी जातीने लक्ष घालून यंत्रणा उभी केली.

बजाज फाउंडेशनच्या वतीने 12 खोल्यांची सुसज्ज इमारत व शौचालय इत्यादींसाठी निधीची उपलब्धता झाली. आमदार संग्राम थोपटे त्यांच्या हस्ते गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शाळेच्या कामास सुरुवात झाली. मध्यवर्ती शाळेत 28 शाळांतील अंदाजे 300 ते 350 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. शिक्षकही या शाळेत सामावून घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी जिल्हा परिषद व टाटा मोटर्स यांच्या माध्यमातून मोफत बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व रणजित शिवतरे यांनी सहकार्य केले.

मध्यवर्ती शाळेमुळे सुविधांअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागत असलेल्या धरणग्रस्त, आदिवासीसह सर्व गोरगरीब कष्टकर्‍यांच्या मुलांंना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक तसेच सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

                                                                         – अमोल नलावडे,
                                                                         माजी जि. प. सदस्य.

Back to top button