रस्त्यांवरील विजेचे खांब धोकादायक; धायरी, सिंहगड रस्ता परिसरात स्थिती | पुढारी

रस्त्यांवरील विजेचे खांब धोकादायक; धायरी, सिंहगड रस्ता परिसरात स्थिती

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : धायरी, सिंहगड रस्ता परिसरातील रस्त्यांवर असलेले धोकादायक वीज फिडर, पथदिवे, विजेचे खांब हटविण्याकडे महापालिका व महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून अपघात, वाहतूक कोंडी या समस्या गंभीर बनल्या आहेत. महापालिकेकडून रस्ता रुंदीकरण, भूमिगत वीज वाहिन्या आदी कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, धायरी फाटा ते धायरी गाव या मुख्य रस्त्यासह डीएसके दळवीवाडी रस्ता, मुख्य सिंहगड रोड,
नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी आदी रस्त्यांवर असलेल्या विजेचे खांब, रोहित्र, पथदिवे, वीज फिडरचा वाहतुकीस अडथळा होत आहे.

धायरी येथील गणेशनगर, आबासाहेबनगर परिसरातील रस्त्यांवर उभे असलेले वीज फिडर, पथदिवे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच भरधाव वेगाने येणारी वाहने विजेच्या खांबांना व फिडरला धडकून अपघात होत असल्याकडे खडकवासला विधानसभा भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी लक्ष वेधले आहे.

ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून या समस्येबाबत पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. धोकादायक पथदिवे, वीज फिडरमुळे रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. यामुळे प्रशासनाने तातडीने विजचे खांब व फिडर हटविणे गरजेचे आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय विद्युत विभागाशी संपर्क साधला असता, रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांत असलेल्या पथदिवे व इतर बाबींची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर रस्त्यात असलेले पथदिवे, खांब हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

किरकटवाटी फाट्यावर समस्या गंभीर
सिंहगड रोडवरील किरकटवाटी फाटा व कोल्हेवाडी येथे ही समस्या गंभीर आहे. नांदेड फाट्यापासून खडकवासलापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करून प्रशस्त रस्ता करण्यात आला आहे. मात्र, किरकटवाडी फाट्यावरील विजेचे खांब, रोहित्र अद्यापही हटविण्यात आले नाही. गावात जाणार्‍या तसेच मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमणे वाढली आहे. त्यात रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

पाच वर्षांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी रस्त्यात येणारे विजेचे खांब, रोहित्र हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. काही खांब हटविले. मात्र, वाहतूक कोंडी होत असलेल्या चौकातील खांब तसेच आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. -रमेश करंजावणे, रहिवासी, किरकटवाडी

Back to top button