चाकण : धावत्या ट्रकमधील मालास आग; तत्परतेने टळली दुर्घटना | पुढारी

चाकण : धावत्या ट्रकमधील मालास आग; तत्परतेने टळली दुर्घटना

चाकण (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौकात एका बंदबॉडी ट्रकमधील साहित्याला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. तातडीने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रकमधील मालाला लागलेली आग नियंत्रणात आणली; त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. चाकण येथील तळेगाव चौक या ठिकाणी वाहतूक पोलिस कारवाई करत असताना बंदबॉडी ट्रक (एमएच 46 एआर 6987) तळेगावकडून शिक्रापूरकडे जात होता. संबंधित ट्रकच्या मागील बाजूने धूर निघताना दिसला.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकास ट्रक थांबवण्यास सांगितले. ट्रकमध्ये काय सामान आहे याची विचारपूस केली. गाडीत गॅसचे सिलिंडर, पॅकिंग प्लास्टिक मटेरियल, बॅटरी व घरगुती सामान असल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी चालकास खाली उतरून ट्रकचा पाठीमागील भाग उघडण्यास सांगितला, तेव्हा प्लास्टिकचे 4 ते 5 मोठे बंडल पेटलेले असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी ट्रकमधील मालास लागलेली आग नियंत्रणात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिस आणि नागरिकांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Back to top button