चाकण : गॅस सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या आता दोन; आजीच्या फिर्यादीवरून नातवावर गुन्हा

चाकण : गॅस सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या आता दोन; आजीच्या फिर्यादीवरून नातवावर गुन्हा
Published on
Updated on

चाकण/महाळुंगे इंगळे : चाकणमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता. चाकणजवळील राणूबाई मळा भागात घडलेल्या या घटनेतील मयत तरुणावर त्याच्या आजीच्या फिर्यादीनुसार चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपूर्वी संबंधित तरुण स्वतः गॅस सिलिंडरची टाकी घेऊन स्वयंपाक घरात गेल्याचे व काडी लावून आत बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय 95) व अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19, दोघे रा. राणूबाई मळा, चाकण, ता. खेड) या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे (वय 75), वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय 17), गीतांजली सुरेश बिरदवडे (वय 39) आणि अंजना प्रभाकर केळकर (सर्व रा, राणूबाई मळा, चाकण) अशी यातील जखमी असलेल्या चौघांची नावे आहेत.

याप्रकरणी लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19) या त्यांच्या नातवावर भा.दं. वि. कलम 304 (अ) व 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 21) सायंकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा नातू अक्षय बिरदवडे हा मोठ्या चुलत्यांच्या घरातून गॅस सिलिंडरची टाकी घेऊन आपल्या घरातील स्वयंपाक खोलीत गेला व दार लावून घेतले.

गॅस सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा वास आल्याने घरातील अन्य कुटुंबीयांनी दाराची कडी वाजवून त्याला दार उघडण्यास सांगितले. मात्र, अक्षय स्वयंपाकाच्या खोलीची आतली कडी लावून काहीतरी करत असतानाच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराच्या भिंती कोसळून आणि होरपळून सहा जण जखमी झाले. अक्षय स्वतः आगीत संपूर्ण होरपळला होता. घराच्या भिंती कोसळल्याने त्याखाली अडकून चंद्रभागा बिरदवडे यांचा आणि होरपळलेल्या अक्षय या दोघांचा
मृत्यू झाला.

चाकण पोलिसांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अक्षय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news