खोर : भीमा-पाटस साखर कारखाना सुरू झाल्याने आ. कुल यांचा प्रयोग यशस्वी

खोर; पुढारी वृत्तसेवा : भीमा-पाटस साखर कारखाना सुरू झाल्याने दौंड तालुक्यात समाधानाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आमदार राहुल कुल यांना याचा फायदा होऊन दौंड तालुक्यात भाजपची सरशी झाल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ’भीमा-पाटस’च्या माध्यमातून राहुल कुल यांचा पहिला राजकीय प्रयोग यशस्वी झाल्याचे दौंड तालुक्यात बोलले जात आहे. बंद पडलेला भीमा सहकारी साखर कारखाना आता कधीच सुरू होणार नाही, अशी व्यूहरचना दौंड तालुक्यात आखण्यात आली होती. कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांसह दौंड तालुक्याच्या मतदारांमध्ये नाराजीचा सुरू होता.
मागील आमदारकीच्या निवडणुकीत राहुल कुल यांना याचा मोठा फटका बसला होता. दौंड तालुक्याचे राजकारण जेथून चालू होते अशी विकासाची गंगाच बंद पडली गेल्याने कुल यांना अनेक निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या संघर्षमय कठीण परिस्थितीचा सामाना करावा लागला होता, हेही तितकेच सत्य आहे. अनेक गावांच्या ग्रामपंचायती कुल यांच्या विरोधातसुद्धा गेल्या होत्या.
मात्र, कारखाना सुरू झाला आणि तालुक्याचे राजकारण तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा दोन आठवड्यांतच पालटले गेले आहे. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाच्या ताब्यात पाच ग्रामपंचायती आल्या आहेत. दौंड तालुक्यात ग्रामपंचायतीसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, दौंड नगरपालिका या निवडणुका अजून बाकी असून, हा समतोल आमदार राहुल कुल राखून हे बालेकिल्ले राखण्यात यशस्वी होणार का? हेच पाहणे पुढील निवडणुकीत महत्त्वपूर्ण असणार आहे,