दौंड ग्रामपंचायत निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्ते सुखावले | पुढारी

दौंड ग्रामपंचायत निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्ते सुखावले

राहु; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं, की गावपातळीवर भावकी-गावकी, गट-तट आलेच. या गट-तटावर थोडेसे लक्ष दिले की ग्रामपंचायत निवडणूक सुखकर होते, याचा अनुभव सध्या दौंड तालुका भाजपला येत आहे. आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनामुळेच तालुक्यात भाजपने हे यश मिळवले आहे. दौंड तालुक्यात झालेल्या आठ ग्रामपंचायतीपैंकी सहा ग्रामपंचायतींवर भाजपचे आमदार राहुल कुल समर्थकांनी एकतर्फी विजय मिळवत झेंडा फडकाविला आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मिरवडी येथे विविध विकासकामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सभा झाली होती, त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे जोरदार पानिपत झालेले पाहावयास मिळत आहे. पाटेठाण येथे माजी आमदार रमेश थोरात समर्थक माजी उपसरपंच गोविंद ऊर्फ पाटील यादव यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन स्थानिक पातळीवर भाजपमध्ये प्रवेश करीत निवडणूक लढवली आणि सर्वच्या सर्व जागा भाजपने मिळवल्या.

देवकरवाडी येथे बाजार समितीचे माजी सभापती मारुती मगर व भीमा-पाटस कारखान्याचे माजी संचालक अरुण देवकर यांच्या गटामध्ये आमदार राहुल कुल यांनी समझोता घडवून आणला. येथे सरपंच पदाच्या उमेदवार सोनाली संदीप देवकर यांनी तृप्ती दिगंबर मगर यांना पाठिंबा दिला आणि दिगंबर मगर यांनी सर्व तरुणांना बरोबर घेत ग्रामपंचायतीच्या आठ जागा जिंकल्या. सरपंचपदाचे उमेदवार सोनाली गणेश कुंजीर यांच्यावर सुमारे 367 मतांनी विजय मिळवला.

विद्यमान सरपंच दिलीप हनुमंत देवकर यांचा एकमेव विजय हा देवकरवाडीमध्ये राष्ट्रवादीला दिलासा देणारा ठरला असला, तरी या ठिकाणी आलेला निकाल हा आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. देवकरवाडी येथे सरपंचपदासाठी व सदस्यपदासाठी शेतकरी संघटनेने काही उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना अपयश पत्करावे लागले.

नादुंर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नांदुर विकास सोसायटीचे चेअरमन पोपटराव बोराटे, माजी सरपंच स्वर्गीय रामभाऊ घुले यांचे चिरंजीव मयूर घुले व सरपंचपदाची उमेदवार युवराज बबन बोराटे यांच्यामध्ये आमदार राहुल कुल यांनी एकी घडवून आणत स्थानिक पातळीवर एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला आणि त्याचे फलित असे झाले, की युवराज बोराटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तथा थोरात गटाचे नांदुर गावचे सर्वेसर्वा विशाल नरेंद्र थोरात यांचा सुमारे 194 मतांनी पराभव केला.

सर्व सूत्रे विशाल थोरात यांनी आपल्याच ताब्यात ठेवल्यामुळे त्यांना या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.असे असले तरी मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक तीनमधून स्वतः विशाल थोरात, तसेच इतर एक सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत. तर, एक सदस्य यापूर्वीच बिनविरोध झालेला आहे.

दहिटणे ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल समर्थकांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. सलग चार वेळा सरपंचपद भूषवलेले दादासाहेब कोळपे व बाळासाहेब पिलाने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सरपंचपद व सात जागा पटकावल्या, मात्र या ठिकाणी माणिक शितोळे व ज्योती कोळपे हेदेखील राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत. शरद कोळपे यांच्या नेतृत्वाचा उदय या निमित्ताने झालेला पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील आठपैकी सहा ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, ग्रामपंचायतीच्या या विजयामुळे राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आमदार राहुल कुल यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना रणनीतीबाबत मार्गदर्शन केले आणि याचा चांगला फायदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला झाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असलेल्या दापोडी येथेही भाजपचे सरपंचपदाचे स्वप्न बनले असले, तरी या ठिकाणी उपसरपंच मात्र भाजपचा आहे.

Back to top button