मंचर : वर्‍हाडी मंडळींना जेवण वाढण्यातून रोजगाराची निर्मिती | पुढारी

मंचर : वर्‍हाडी मंडळींना जेवण वाढण्यातून रोजगाराची निर्मिती

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील विविध मंगल कार्यालयांत वर्‍हाडी मंडळींना जेवण वाढण्यासाठी दुष्काळी भागातील सातशे ते आठशे महिला व युवकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. अवसरी, मंचर, निरगुडसर, पारगाव, घोडेगाव, कळंब, अवसरी फाटा, राजनी येथील परिसरात मोठी अलिशान मंगल कार्यालये व लॉन्स उभारले आहेत. लग्नसराईत सर्व मंगल कार्यालये हाऊसफुल होत असून, लग्न धुमधडाक्यात होत आहेत.

जेवणावळीत वाढप्यांना दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपये रोज मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याचे अवसरी बुद्रुक येथील यशोदीप गार्डन मंगल कार्यालयाच्या मालक आशा चव्हाण, कारफाटा राजनी येथील श्री लक्ष्मी नरसिंह गार्डन मंगल कार्यालयाचे मालक संतोष वाघ आणि व्यवस्थापक मनोज वाघ यांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक मंगल कार्यालयांत वाढपी महिलांना ड्रेस असल्याने त्या सहज लक्षात येतात.

जुन्या काळात घरासमोर, शेतात होणारा लग्नसोहळा आता मंगल कार्यालयात होऊ लागला आहे .पंधरा वर्षांपूर्वी अवसरी बुद्रुक येथील संजय जयवंतराव चव्हाण (देशमुख) यांनी आंबेगाव तालुक्यातील प्रथम यशोदीप मंगल कार्यालयाची उभारणी केली. त्यानंतर निरगुडसर, पारगाव, मंचर, कळंब, घोडेगाव आणि परिसरात सुमारे वीस मंगल कार्यालये उभारली गेली. या मंगल कार्यालयांत लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणावर होत असतात. या सर्व कार्यालयांत महिला व तरुण कामगार जेवण वाढण्याचे काम करत असतात. कार्यालय मालकाकडून सुमारे सातशे ते आठशे महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती यशोदीप गार्डन मंगल कार्यालयाचे मालक सई चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button