

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : येथील कोयाळी-पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्यांचे उद्घाटन नुकतेच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या असलेल्या या शाळेच्या कार्यक्रमात वर्गखोल्यांच्या बाबतीत योगदान असलेल्या जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे या अनुपस्थित राहिल्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना तोंड फुटले. शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनीदेखील कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने शिक्रापूरच्या राजकारणामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
येथील कोयाळी-पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेच्या नऊ वर्गखोल्यांचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले. एकूण आठ वर्गखोल्यांपैकी दोन वर्गखोल्या या लोकवर्गणीतून, चार वर्गखोल्या या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून, तर उर्वरित दोन वर्गखोल्या जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद निधीतून बांधल्या गेल्या. प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमाला त्या स्वत: तसेच त्यांचे पती शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठे प्रस्थ असलेले बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे हेदेखील उपस्थित नसल्याने अनेक तर्कवितर्क चर्चिले गेले.
दरम्यान, कुसुम तसेच आबाराजे मांढरे यांना निमंत्रण देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय होता आणि निमंत्रण त्यांना दिले गेले असेल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक अशोक बगाटे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे होते. कार्यक्रमाला उपसरपंच विशाल खरपुडे, सुभाष खैरे, मयूर करंजे, रमेश थोरात, माजी सरपंच आबासाहेब करंजे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब सासवडे, ग्रामपंचायत सदस्या सारिका सासवडे, वंदना भुजबळ, पूजा भुजबळ तसेच गणेश लांडे, नानाभाऊ गिलबिले, दीपक भुजबळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे, उपाध्यक्षा सोनल सोनवणे, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या वेळी पूजा भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.
योग्यवेळी बोलेनच, थोडे दिवस थांबा : कुसुम मांढरे
शाळा खोल्या उद्घाटनप्रसंगी आपण उपस्थित नव्हते, हे खरे आहे. याबद्दल आपण लवकरच बोलणार आहोत. एक मात्र नक्की की, मी उपस्थित नसण्याने अनेक पालकांनी आपल्याकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, आठपैकी आठही वर्गखोल्यांबाबत आपले योगदान सर्वश्रुत आहे. तरीही झालेला प्रकार आणि माझी अनुपस्थिती याबद्दल आपण लवकरच बोलू.