पुणे : शासकीय रुग्णालयांत होणार परवडणार्‍या दरात दंत उपचार | पुढारी

पुणे : शासकीय रुग्णालयांत होणार परवडणार्‍या दरात दंत उपचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आहाराच्या सवयी, जीवनशैली अशा विविध गोष्टींचा परिणाम इतर अवयवांप्रमाणे दातांवरही होताना दिसतो. दातांच्या दुखण्यावरील उपचार महाग असल्याने अनेकदा दुखणे अंगावर काढले जाते. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार महागडे असल्याने सर्वसामान्यांना परवडणारे नसते. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये दातांचे उपचार परवडणा-या दरात घेता येऊ शकतात. औंध जिल्हा रुग्णालयात दातांमधील कीड काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे, कॅप बसवणे, कवळी बसवणे, रुट कॅनाल हे उपचार करण्यात येतात. जिल्हा रुग्णालयात दररोज 30 ते 40 रुग्ण दंतोपचारासाठी येतात.

रुग्णांसाठी वेटिंग नसल्याने सहज उपचार मिळणे शक्य झाले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तळमजल्यावर 27 नंबरच्या कक्षात दंतरोग विभाग असून, येथे रुग्णांच्या उपचारासाठी दोन दंतोपचार खुर्च्या आहेत. दातांचे उपचार करण्यासाठी येथे दोन डॉक्टर आहेत. साहाय्यकांच्या मदतीने येथे उपचार करण्यात येतात. ओपीडीची वेळ सकाळी व दुपारी अशी दोनवेळा आहे. या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातून रुग्ण उपचारांसाठी येतात.

दातांच्या उपचारांसाठी सामान्यांना खासगी रुग्णालयांमधील दर परवडत नाहीत. कारण साधा दाताचा एक्स-रे काढायचा असला, तरी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागतात. दात काढणे, दातांची कीड काढणे, सिमेंट भरणे किंवा रुट कॅनाल करणे यासाठी तर दोन हजारांपासून 10 हजार रुपयांपर्यंत शुल्क लागते. वाकडे दात सरळ करायचे असल्यास चाळीस ते साठ हजार रुपये खर्च येतो.
औंध जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारचे दंतोपचार करण्यात येतात. कवळी बसवण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही उपचारांसाठी वेटिंग नाही. त्यासाठी रुग्णांना अपॉइंटमेंट देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना सर्व सुविधा मिळत आहेत, अशी माहिती औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

Back to top button