पुणे : पीएमपी चालकांचा बेशिस्त थांबा; रस्त्यातच गाड्या थांबवल्याने वाहतूक कोंडी | पुढारी

पुणे : पीएमपी चालकांचा बेशिस्त थांबा; रस्त्यातच गाड्या थांबवल्याने वाहतूक कोंडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी चालकांचा बेशिस्तपणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, प्रवाशांशी हुज्जत घालण्यासोबतच आता चालक बसथांबा सोडून रस्त्यावरच गाड्या उभ्या करत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनाद्वारे प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 गाड्या आहेत. यातील स्व:मालकीच्या 1 हजार आणि ठेकेदारांच्या 1100 आहेत. ठेकेदारांच्या गाड्या जास्त असल्याने ठेकेदार आणि त्यांचे चालक मनमानी कारभार करत आहेत.

याचा प्रशासनासह प्रवाशांना त्रास होत आहे. पीएमपी चालक वाहतूक नियमांची सर्रासपणे ऐशी-तैशी करत असल्याचे दिसत आहेत. सिग्नलला बस न थांबविणे, अतिवेगाने बस पळविणे, उद्धट वर्तन, सुट्टे पैसे परत न देणे, नो एन्ट्रीत गाडी चालविणे, थांब्यांवर गाड्या उभ्या न करणे यांसारखे प्रकार चालकांकडून घडत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.

गाडी चालविताना मोबाईलवर बोलतात…
पीएमपीचे चालक अनेकदा बस चालविताना मोबाईलवर बोलताना पाहायला मिळतात. अशा गैरवर्तनाने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अनेक चालक आता गाडी चालवताना कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत असल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा बेशिस्त चालकांवर वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे.

बस थांब्यावर बस न थांबविणे, बस थांबा सोडून रस्त्यातच बस थांबविणे, यांसारख्या चालकांच्या तक्रारी आम्हाला आल्या आहेत. यासंदर्भात चालकांना शिस्त लागण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देत असून, बेशिस्तपणा करणार्‍या चालकांवर कडक कारवाईदेखील करण्यात येत आहे.
                                                          – ओमप्रकाश बकोरिया,
                                       अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button