पिंपरी : मनोरंजक खेळाद्वारे गणिताचा अभ्यास; मनपाच्या 50 शाळांमध्ये उपक्रम | पुढारी

पिंपरी : मनोरंजक खेळाद्वारे गणिताचा अभ्यास; मनपाच्या 50 शाळांमध्ये उपक्रम

वर्षा कांबळे

पिंपरी : विद्यार्थिदशेत मुले गणित विषयाला घाबरतात. पण एकदा गणित विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या की, गणित विषयाची आपल्याला गोडी लागते. गणिताची हीच गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी गणित विषयातील विविध कठीण संकल्पनांना अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग किंवा खेळाद्वारे मनोरंजक पद्धतीने मांडल्या जातात. सेव्ह द चिल्ड्रन इंडिया, विपला फाउंडेशन, एडूको यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 50 शाळांमध्ये सध्या प्रकल्प चालू आहे.

स्मॅक उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांना गणित विषयातील विविध कठीण संकल्पनांना अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग किंवा खेळाद्वारे व मनोरंजक पद्धतीने शिकवल्या जातात. विज्ञान व गणित अभ्यासक्रमातील असे घटक जे मुलांना समजण्यासाठी कठीण जातात ते निवडून त्यावर आधारित साधे प्रयोग आणि साहित्याची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक ‘स्मॅक टीचर’कडे दहा शाळा असून प्रत्येक शाळेमध्ये गणिताचे एक सत्र होते. या गणिताच्या सत्रांमध्ये शाळेतील शिक्षकांचा सहभाग घेऊन हा उपक्रम राबविण्यात येतो.

गणित जत्रा
या महिन्यापर्यंत झालेल्या उपक्रमअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये सध्या गणित जत्रा आयोजित केली आहे. यामध्ये विविध गणिते संकल्पनांवर आधारित काही शैक्षणिक साहित्य तयार करून या मुलांना स्टॉल मांडण्याची संधी दिली जाते. या स्टॉलमध्ये विविध गणितीय संकल्पनांचा खेळ व मनोरंजक पद्धतीने मुलांना सांगण्यात येतात. उदा. साप शिडी प्रमाणे अंकाची शिडी असते. तसेच मुलांना कार्ड दिली जातात. त्यामध्ये जो अंक येईल त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार करायला सांगणे. यातून गणिते सोडविली जातात. जी मुले अप्रगत आहेत किंवा सपोर्ट सेंटरमध्ये आहेत. या मुलांनादेखील या स्टॉलमध्ये संधी दिली जाते. यामुळे गणितामध्ये असणारी भीती कमी होते व गणिताकडे मुले आकर्षित होतात व गणिताच्याकडे खेळाच्या रूपाने पाहून त्यांना खेळातून ती संकल्पना समजून घेणे सोपे जाते.

बेरीज गिरणी, अंकाची खिडकी, तारमणी
गणित जत्रेमध्ये फक्त सहावी ते आठवीच्या मुलांचा सहभाग न घेता बालवाडी ते सातवी व आठवीच्या मुलांपर्यंत सर्व मुलांना संधी आता दिली जाते. इयत्तेनुसार आपण त्यांना त्या संकल्पना सोप्या करून तिथे मांडण्यात येतात. उदा. बेरीज गिरणी, अंकांची खिडकी, संख्याज्ञान, तारमणी. यामध्ये खाऊ गल्ली गणिताचे स्टॉल विज्ञानाचे स्टॉल फन गेम व विविध घटकांचा समावेश यामध्ये होतो. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, शिक्षक व पालक या सर्वांचा सहभाग आहे.

अनेक मुलांना गणिताबद्दल भीती असते. किंवा तो अवघड विषय आहे असा समज असतो. परंतु ज्या वेळेला त्यांना एखादी गणितीय संकल्पना खेळाद्वारे त्यांना समजून सांगितल्यास त्यांनासुद्धा गणित विषयात आवड निर्माण होते व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो, म्हणून गणिताचा पारंपरिक पद्धतीने न शिकवता त्यामध्ये थोडासा वेगळा प्रयत्न आपण केला तर त्या गणितीय संकल्पना मुलांपर्यंत पोहोचण्यास सोप्या व कायम स्वरूपी लक्षात राहण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते.

                                                     – सोमनाथ हुचगोळ, स्मॅक विभाग प्रमुख

Back to top button