पुणे : वाहनचोरी, घरफोड्या करणार्‍या अट्टल सराईताला बेड्या; ६ दुचाकी जप्त, १३ गुन्ह्यांचा छडा | पुढारी

पुणे : वाहनचोरी, घरफोड्या करणार्‍या अट्टल सराईताला बेड्या; ६ दुचाकी जप्त, १३ गुन्ह्यांचा छडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरात वाहनचोरी, जबरी चोर्‍यांसह घरफोड्या करणार्‍या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून घरफोडी, जबरी चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अब्दुल महमंद शेख (१९, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा रेकॉर्डवरील सराईत आहे.

शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. यानूसार वरिष्ठ अधिकार्‍यांकडून गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान घरफोडी, वाहनचोरी करणारा संशयीत आरोपी शेख हा इस्कॉन मंदिराजवळ थांबल्या असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरात वाहनचोरी, घरफोडी आणि जबरी चोर्‍याचे अनेक गुन्हे केल्याची कबूली दिली. यानूसार पथकाने शेखला अटक केली. त्याच्याकडून चोरीची ६ दुचाकी वाहने आणि इतर गुन्ह्यातील काही मुद्देमाल जप्त केला आहे. शेख हा पुणे शहरासह जिल्ह्यात देखील वाहनचोरी, घरफोडीचे गुन्हे करत होता.

त्याच्याकडून शहरातील कोंढवा, वानवडी, चतुःश्रुंगी, हडपसरसह जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्यात गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पोर्णिमा तावरे, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार निलेश देसाई, गोरक्षनाथ चिनके, ज्योतीबा पवार, संतोष बनसुडे, सागर भोसले, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button