इंदापूर : 131 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व | पुढारी

इंदापूर : 131 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात 221 ग्रामपंचायतींपैकी 131 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवारी (दि. 20) इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष गारटकर बोलत होते. गारटकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालामध्ये निर्विवादपणे 131 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केल्याचे गारटकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी हे गावपातळीवर तळागाळापर्यंत काम करत असतात. जनतेशी जोडलेली नाळ आणि केलेल्या विकासकामांमुळेच हे चांगल्या पद्धतीचे यश राष्ट्रवादी काँग्रेसने संपादित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 13 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. मुळशी तालुक्यामध्ये 11 ग्रामपंचायत होत्या, त्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडल्या आहेत. खेड तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतींपैकी 18 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व 4 ग्रामपंचायती संमिश्र आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात 21 पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 3 ग्रामपंचायती संमिश्र लागल्या आहेत. शिरूर तालुक्यात चारपैकी दोन राष्ट्रवादी, वेल्हा तालुक्यामध्ये 28 पैकी 13 राष्ट्रवादीच्या तर 6 ग्रामपंचायती संमिश्र आहेत.

भोर तालुक्यामध्ये 54 पैकी 24 राष्ट्रवादी आणि 7 ग्रामपंचायती या काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्हीच्या विचाराच्या आल्या आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये 16 पैकी 10 राष्ट्रवादी व 1 संमिश्र, मावळ तालुक्यामध्ये 9 पैकी 7, इंदापूर तालुक्यामध्ये 26 पैकी 12 आणि संमिश्र तीन आल्या आहेत. हवेली तालुक्यामध्ये 7 पैकी 3, दौंड तालुक्यामध्ये 7 पैकी 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आल्या आहेत आणि संमिश्र 26 ग्रामपंचायती आल्या आहेत.  दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील बेलवाडी, डाळज
नंबर एक, दोन आणि तीन या चार गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली होती.

Back to top button