पुणे : अंधार्‍या आयुष्याला कलेतून गवसला सूर ; ठिकठिकाणी रस्त्यावरच करताहेत सादरीकरण | पुढारी

पुणे : अंधार्‍या आयुष्याला कलेतून गवसला सूर ; ठिकठिकाणी रस्त्यावरच करताहेत सादरीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनामुळे त्यांच्या नोकर्‍या गेल्या अन् त्यांचे जगणे कठीण झाले… त्यांना ऑर्क्रेस्ट्राचे कार्यक्रमही मिळेनात….मग, दृष्टिहीन कलाकारांनी कलेला ढाल बनवून ठिकठिकाणी रस्त्यावरच गायन-वादनाचे कार्यक्रम सुरू केले. चित्रपटगीतांपासून ते भक्तिगीतांपर्यंत… आज थेट रस्त्यावरच सुरू असलेल्या दृष्टिहीन कलाकारांचा हा गायन-वादनाच्या ऑर्क्रेस्ट्राला लोकांची दाद मिळत आहे. लोक रस्त्यावर थांबून त्यांचे सादरीकरण पाहतात अन् दादही देतात. आयुष्यातील अंधार्‍या जीवनात कलेचा प्रकाश आणत त्यांनी कलेलाच जगण्याचा आधार बनवला आहे.

दिव्यांग संगीत साधना (निगडी) संस्थेतील हे दृष्टिहीन कलाकार ठिकठिकाणी रस्त्यावरच गायन-वादनाचे कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या या कलेला पुणेकरांचीही मनमुराद दाद मिळत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयावरील कलाकार कट्टा असो वा जंगली महाराज रस्ता… जिथे मिळेल तिथे रस्त्यावरच त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू होतो अन् सुरेल गायनाने, वादनाने ते येणार्‍या-जाणार्‍यांची मने जिंकतात. नोकरी गमावलेल्या अन् जगण्यासाठी संघर्ष करणार्‍या या कलाकारांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आहे.

रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी थांबतात, त्यांची सुरेल गाणी ऐकतात आणि त्यांना दाद देतात, हीच आमची खरी कमाई असल्याचे अन् सादरीकरणात कधीही अंधत्व आड येत नसल्याचे हे कलाकार सांगतात. याविषयी संस्थेचे दत्ता भालेराव म्हणाले, आम्ही ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करायचो. कार्यक्रम मिळणे कठीण झाले. त्यामुळे सध्या आम्ही विविध ठिकाणी रस्त्यावरच सादरीकरण करतो. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. सध्या 10 ते 15 कलाकार रस्त्यावर सादरीकरण करीत आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळत आहे.

कधी-कधी चांगला प्रतिसाद मिळतो. पण, काही जण त्रासही देतात. त्याकडे दुर्लक्ष करीत आम्ही सादरीकरण करतो. प्रत्येकाने संगीताचे धडे घेतले आहेत. काही जण नोकरी करत होते, पण काहींच्या नोकर्‍या गेल्यामुळे जगण्याचा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि कलेला वाव देत सादरीकरण करायला लागलो.

Back to top button