पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या | पुढारी

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कात्रज भागात तरुणाला गजाने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय 27, सच्चाईमाता मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संकेत पवार, आदित्य कांचन आणि अभिजीत सावंत या तिघांना अटक केली आहे.  पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून तिघांनी हा खून केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी सांगितले. याबाबत पोलिस कर्मचारी अनिल भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील दुगड शाळेजवळ रेणुसे गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेणुसेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रेणुसे याचा मृत्यू बेदम मारहाणीत झाला आहे. त्याच्या डोक्यावर गजाने मारहाण केल्याचे आढळून आले. शवविच्छेदन अहवालात रेणुसेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.  त्या वेळी आरोपी आदित्य आणि खून झालेला तरुण रेणुसे यांच्यात पंधरा दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्या कारणातून त्याने इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक तपास करीत आहेत.

Back to top button