पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण | पुढारी

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण

पुणे : निपुण भारत योजनेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय आकलनाचे मूल्यमापन 22 डिसेंबर ते 7 जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे मूल्यांकन करण्यात येईल.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राजेश पाटील यांनी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मार्गदर्शन सत्रात सर्वेक्षणाबाबतच्या सूचना दिल्या. मूल्यमापन विभागाचे विभाग उपप्रमुख महादेव वांडरे, भाषा विभागाचे विभाग उपप्रमुख डॉ. राजेश बनकर, गणित विभागाच्या विभाग उपप्रमुख डॉ. रत्नप्रभा भालेराव, अधिव्याख्याता वृषाली गायकवाड, इंग्रजी विभागाचे विभाग उपप्रमुख डॉ. अरुण संगोलकर, ऊर्दू विभागाचे विषय सहायक तोसिफ परवेझ, परिसर अभ्याससाठी विज्ञान विभागाच्या विभाग उपप्रमुख तेजस्विनी आळवेकर, सामाजिक शास्त्र विभागाच्या अधिव्याख्याता डॉ. ज्योती राजपूत यांनी मार्गदर्शन केले. उपसंचालक विकास गरड, डॉ. कमलादेवी आवटे, अभिनव भोसले उपस्थित होते.निपुण भारत योजनेंतर्गत सर्वेक्षण शाळांतील शिक्षकांमार्फतच करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्तानिहाय, विषयनिहाय आकलन किती झाले याची पडताळणी करणे, शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.

सर्वेक्षणात आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञांची मदत घेता येईल. सर्वेक्षणाच्या कालावधीत वर्गात तणावमुक्त वातावरण राहण्याची काळजी घेण्यात यावी. सर्वेक्षण शाळेच्याच वेळेत करण्यात येईल. शाळेतील वर्ग, विद्यार्थी संख्या, शिक्षक यांच्या संख्येनुसार, सुटीचा कालावधी विचारात घेऊन शाळास्तरावर नियोजन करता येईल तसेच विद्यार्थी संख्येनुसार हा कालावधी कमी किंवा जास्त होऊ शकतो. www.maa.ac.in या संकेतस्थळाद्वारे सर्वेक्षणासाठीची साधने उपलब्ध करून दिली जातील. शिक्षकांनी या संकेतस्थळावरून साधने डाऊनलोड करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या  प्रतिसादानुसार श्रेणी…

प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे मौखिक स्वरूपात, आवश्यकतेनुसार लेखीपद्धतीने चाचणी घेतली जाईल. सर्वेक्षणासाठी मूल्यांकन स्तर आणि निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्याकडून मिळणार्‍या प्रतिसादानुसार प्रगत (3), प्रवीण (2), प्रगतशील (1) आणि प्रारंभिक (0) या दरम्यानची श्रेणी दिली जाईल. विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळावी म्हणून शिक्षकांनी अतिरिक्त मदत करू नये. अतिरिक्त मदत केल्यास विद्यार्थ्याचे आकलन नेमकेपणाने समजणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

Back to top button