बावडा : निवडणुकीत जय-पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारा; पराजय कायमचा नसतो | पुढारी

बावडा : निवडणुकीत जय-पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारा; पराजय कायमचा नसतो

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : लोकशाही म्हटले की निवडणुकीला सामोरे जावे लागते व मतदानानंतरच्या निकालामध्ये एकाचा जय, तर कोणाचा तरी पराजय, हा ओघाने ठरलेला असतो. हा जय-पराजय फक्त पाच वर्षांसाठी असतो, कायमचा नसतो. लोकशाहीमध्ये मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे दिलेला कौल हा खिलाडीवृत्तीने सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

राज्यासह पुणे जिल्ह्यात व इंदापूर तालुक्यात चुरशीने पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी (दि. 20) जाहीर होणार आहेत. मतदारांनी दिलेला कौल हा लोकशाहीत मान्य करावा लागतो, नव्हे तर लोकशाहीत जनतेचा कौल अंतिम असतो. लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिल्याने कोणा एकाला तरी मतदान करावे लागते, त्यामुळे निवडणूक निकालानंतर सर्वांशी पूर्वीप्रमाणे वागा, सर्व माणसे ही आपलीच असतात. आता नसली तरी नंतर ती आपणास उपयोगी पडत असतात, असेही जाणकार नागरिकांनी सांगितले.

आपल्या गावामध्ये आपल्याच वॉर्डात 10 वर्षांपूर्वी ग्रा. पं. सदस्य कोण होते, हेही आपणास लवकर सांगता येत नाही. त्यामुळे संयम हे सर्व समस्येवर मोठे औषध आहे. त्यामुळे निवडणुकीची चर्चा चार-आठ दिवसात थांबते व सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होते. त्यामुळे मानवी जीवनात संयम हा यशाकडे घेऊन जात असतो, असेही राजकारणातील अनुभवी कार्यकर्त्यांनी सांगितले.

आता निवडणुका संपल्या आहेत. पूर्वीप्रमाणे मैत्री चालू ठेवा. निवडणुकीत यश-अपयश आले तरी एखाद्याला दोष देऊ नका. कारण, लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, तो मान्य केलाच पाहिजे. निवडणुकीतील जय-पराजय झालेल्या दोघांनीही सामाजिक कामे करावीत, असा सल्लाही निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांना देण्यात आला आहे.

निवडणुका हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असतो. गेल्या निवडणुकीत जे आपल्या विरोधात होते, त्यातील काही जण चालू निवडणुकीमध्ये आपल्याकडे आले आहेत व आपल्याकडे होते त्यातील काही जण हे विरोधात गेले आहेत. हे लोकशाहीतील सत्य स्वीकारा, असा सल्ला जाणकार तज्ज्ञांनी राजकीय कार्यकर्त्यांना दिला आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक असल्याने या निवडणुकीस अनेक कंगोरे असतात, त्यामुळे चांगले उमेदवारही काहीवेळा अपयशी ठरतात, असा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मंगळवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार्‍या मतमोजणीतून बाहेर येणार्‍या निकालाकडे लागून राहिले आहे.

 

Back to top button