झेंडेवाडी येथे धनदांडग्यांनी ग्रामपंचायतीचा बंधारा फोडला | पुढारी

झेंडेवाडी येथे धनदांडग्यांनी ग्रामपंचायतीचा बंधारा फोडला

सासवड; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. परिणामी, या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यातच झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे एका बिल्डरने आपल्या भूखंडातून जाणारे नैसर्गिक स्रोत असणारा ओढा मुरूम, माती, दगड टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या कामास विरोध दर्शविला आहे. धनदांडग्यांकडून ओढा गिळंकृत होत असताना संबंधित विभाग व प्रशासन गप्प का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

झेंडेवाडी गावच्या उत्तर-पूर्व दिशेकडील नैसर्गिक जलस्रोत (बंधारा) अज्ञात इसमांनी जेसीबी यंत्राव्दारे फोडलेला असून, गावासाठी अत्यंत उपयोगी असलेला पाणीसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे झेंडेवाडी गावातील नागरिक तसेच पशुधन, गुरेढोरे यापुढील काळात पाण्यापासून वंचित राहणार आहेत.

संबंधितांनी शासकीय मालकीच्या ग्रामपंचायतीकडून खर्च करण्यात आलेले जलसाठे अनधिकृतरीत्या बुजवून टाकलेले आहेत. तसेच जलसंधारण अधिकारी, छोटे पाटबंधारे उपविभाग पंचायत समिती, पुरंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधितांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान करून अनधिकृतपणे जमीन उत्खनन व पाझर तलावातील माती-मुरूम उत्खनन केलेले आहे. याप्रकरणी अनधिकृत प्लॉटिंगसाठी शासकीय मालमत्तेचे नुकसान व अनधिकृत उत्खनन जमीन विकसन केल्याने संबंधितांविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

Back to top button