पुणे : आता विद्या प्राधिकरणाचेही ’टेलिग्राम’ चॅनेल; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ | पुढारी

पुणे : आता विद्या प्राधिकरणाचेही ’टेलिग्राम’ चॅनेल; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य यांना शिक्षण विभागातील विविध गोष्टींची माहिती व्हावी, शासनाच्या सर्व सूचना त्यांना वेळेत मिळाव्यात, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणामार्फत ‘टेलिग्राम’ चॅनेल सुरू करण्यात आले आहे. याचा राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक राजेश पाटील यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांसाठी, शिक्षकांसाठी विविध योजना, याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय शैक्षणिक सर्वेक्षणे, विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्यस्तरावरून आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धा, विविध ऑनलाइन उपक्रम, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील विविध स्पर्धा, उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यांची वेळापत्रके, अशा विविध गोष्टींसाठी राज्यस्तरावरून विभाग, जिल्हा तसेच तालुकास्तरावर पत्रव्यवहार केला जातो.

राज्यस्तरावरून दिल्या जाणार्‍या सूचना शाळास्तरावर तत्काळ उपलब्ध होतातच असे नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्यस्तरावरील अशा स्वरूपाची महत्त्वाची शैक्षणिक माहिती, पत्रव्यवहार तसेच शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारे उपक्रम यांची माहिती राज्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना एकाचवेळी व तत्काळ उपलब्ध व्हावी, यादृष्टीने ’टेलिग्राम’ चॅनेल सुरू करण्यात आले आहे.

यासंदर्भात सर्व शिक्षकांना कळविण्यात यावे; जेणेकरून राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापर्यंत शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम अथवा माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल, असे पाटील यांनी सांगितले. विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले आहेत.

टेलिग्रामची ही आहे लिंक…
शिक्षण विभागातील विविध गोष्टींची माहिती व्हावी, हा असा चॅनेल सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ‘टेलिग्राम’ चॅनेलची लिंक – : https:// t. me/ MhTeachers

Back to top button