पुणे : गोवर नमुन्यांसाठी तीनच प्रयोगशाळा | पुढारी

पुणे : गोवर नमुन्यांसाठी तीनच प्रयोगशाळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढला असला, तरी संशयित रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल दहा-पंधरा दिवस प्रलंबित राहत आहेत. राज्याला नमुने तपासणीसाठी मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद येथील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. ससून रुग्णालयासह आणखी काही प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

राज्यात गोवरच्या उद्रेकाला सुरुवात झाली. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘फीवर विथ रॅश’ असलेल्या मुलांची तपासणी, लसीकरण यावर भर दिला जात आहे. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात असून, अहवाल येण्यास विलंब होत आहे. सध्या महाराष्ट्रातील गोवरच्या नमुन्यांची तपासणी करणार्‍या तीन प्रयोगशाळांमध्ये मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी फील्ड युनिट, अहमदाबादमधील बी जे मेडिकल कॉलेज आणि हैदराबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन यांचा समावेश आहे.

राज्यात 19 डिसेंबरपर्यंत 139 उद्रेक झाल्याची नोंद आहे. यामध्ये 1087 रुग्णांमध्ये गोवरचे निदान झाले असून, 17 हजार 347 संशयित रुग्ण आहेत. गोवरमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. गोवरच्या प्रत्येक प्रकरणाचा अहवाल देण्यावर लक्ष केंद्रित आहे. गोवरसारखी लक्षणे आढळल्यास पालकांनीही मुलांना बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button