पुणे : महापालिका उभारणार शोभेची कृत्रिम झाडे | पुढारी

पुणे : महापालिका उभारणार शोभेची कृत्रिम झाडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात होणार्‍या जी 20 परिषदेसाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सुशोभीकरणाची विविध कामे हाती घेण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर शोभेची कृत्रिम झाडे उभी करण्यात येणार आहेत. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत 20 देशांची ’जी 20 परिषद’ 2023 मध्ये पुण्यात होणार आहे.

पुण्यातही जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध 100 हून अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील 60 चौक आणि चौकात बेटे यांचे सुशोभिकरण केले जात आहे. परिषदेच्या बैठकीसाठी येणारे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावेत.

ते नादुरूस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पथदिव्यांंच्या खांबांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. सुशोभिकरणाचाच एक भाग म्हणून विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर विजेचा झगमगाट असलेली कृत्रिम झाडे उभारली जाणार आहेत. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेत्त्वावर घेतली जाणार आहेत. एका झाडावर 180 वॅटचे बल्ब असून, एका झाडासाठी 15 ते 20 हजार रुपये भाडे जाणार असल्याचे कंदुल यांनी सांगितले.

Back to top button