पुणे: माजी सभापतीच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा, बेल्हेमधील खळबळजनक घटना

पुणे: माजी सभापतीच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा, बेल्हेमधील खळबळजनक घटना
Published on
Updated on

बेल्हे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: बेल्हे गावचे नेते व माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या 'रामटेक' बंगल्यावर सोमवारी (दि. १९) पहाटे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. या वेळी दरोडेखोरांनी ६५ तोळे सोन्यांसह चार लाखांची रोकड असा २८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लांबविला. सुमारे दोन तास सात ते आठ दरोडेखोर बंगल्यामध्ये बिनधास्त वावरत होते. मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी बोरचटे यांच्या कारमधून पोबारा केला.

माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचा अहमदनगर-कल्याण महामार्गावर बेल्हे बाह्यवळण चौकात 'रामटेक' नावाचा दोनमजली बंगला आहे. त्यांचा मुलगा, सून, नातवंड आणि कुटुंबीय तेथे राहतात. सोमवारी पहाटे बंगल्याच्या खिडकीचे गज कापत असल्याच्या आवाजाने त्यांची सून जागी झाली. तिने पतीला जागे करत असतानाच दरोडेखोरांनी दरवाजा उघडला. दरोडेखोरांनी त्यांना पिस्तूल रोखून गप्प केले आणि ते बंगल्यात शिरले. बोरचटे यांचा मुलगा, नातू जागा होऊन त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी एका दरोडेखोराने मारहाण करत गोळी मारण्याची धमकी दिली.

रामभाऊ बोरचटे हे त्यांच्या खोलीतून बाहेर आले असता दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. त्यांच्या खोलीतील कपाटातून रोकड, सोन्याचे दागिने काढून घेतले आणि सर्वांना एका खोलीत कोंडून ठेवले. यानंतर बोरचटे यांच्या घरातील ६५ तोळे सोने, काही चांदी आणि ४ लाखांची रोकड असा २८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज बोरचटे यांच्याच बॅगेत भरला आणि त्यांच्या गाडीने (एमएच १४ डीएक्स ६५९५) दरोडेखोरांनी पलायन केले. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान दरोड्याची माहिती मिळताच जुन्नर उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सिरीमकर व पथकासह निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी धाव घेतली.

संपूर्ण काळजी घेत टाकला दरोडा

कोणीही पाठलाग करू नये, कोणालाही मदतीला बोलावू नये यासाठी दरोडेखाेरांनी सर्वांचे मोबाईल संच ताब्यात घेतले होते. यासाठी दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यात तेलाचा डबा ओतला होता. दरोडेखोरांनी बंगल्याच्या संरक्षण भीतीच्या तारा तोडून अंगणात प्रवेश केला. बंगल्यात शिरण्यापूर्वी बोरचटे यांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध दिल्याचे समोर आले आहे.

विविध यंत्रणा कार्यान्वित

दरोडेखोरांनी घरातील सामान अस्तव्यस्त केले होते. शोधपथके तयार करून संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. फिंगर प्रिंट ब्यूरो, डॉग युनिट, तांत्रिक विश्लेषण शाखा अशा तपास यंत्रना घटनास्थळी दाखल झाल्या असून, दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

घरातील सुकामेव्यावर मारला ताव

बंगल्यात काजू, बदाम, मनुके, अक्रोड आदींवरही ताव दरोडेखोरांनी मारला. खाली असलेल्या किचनमध्ये रात्रीची उरलेली वांग्याची भाजी, भात, पोळ्यांसह डब्यांमध्ये असलेला दिवाळी फराळावरही दरोडेखोरांनी ताव मारला. तसेच, जाताना काजू, बदामही घेऊन गेले.

डोक्यात टोप्या, अंगात जर्किन आणि तोंडाला रुमाल बांधलेले सहा ते सात दरोडेखोर होते. टोळीतील सर्व दरोडेखोर हिंदी-मराठीत बोलत होते. दरोडेखोर एकमेकांच्या सूचनेप्रमाणेच वावरत होते. दरोडेखोरांकडे पिस्तूल अन्‌ हत्यारे असल्याने त्यांना विरोध केला असता तर जिवावर बेतले असते. त्यामुळे त्यांना जे न्यायचे ते नेऊ दिले. दोन-सव्वादोन तास ते बंगल्यात होते. आम्हा सर्वांना त्यांनी वरच्या बेडरूममध्ये डांबले होते. जातानाही ते स्विफ्ट डिझायर कार घेऊन गेले.

– सदाशिव बोरचटे

सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला साेबत

बोरचटे यांची कार घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांनी कार भोरेवस्ती फाट्यावरील ढाब्याजवळ सोडून दिल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक आणले असता, तेही जाग्यावरच घुटमळत राहिले. चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीचे डीव्हीआरही सोबत नेल्याने पुरावाच ठेवला नाही. तसेच, येतानाही दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे उलटे फिरविल्याचे आढळले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news