मावळातील 8 ग्रामपंचायतींसाठी 79.80 टक्के मतदान | पुढारी

मावळातील 8 ग्रामपंचायतींसाठी 79.80 टक्के मतदान

वडगाव मावळ :  पुढारी वृत्त्तसेवा :  मावळ तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य पदासाठी व इंदोरीच्या सरपंचपदासाठी आज झालेल्या निवडणुक मतदान प्रक्रियेत सुमारे 79.80 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि.20 रोजी वडगाव मावळ येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. तालुक्यातील इंदोरी, वरसोली, कुणे नामा, सावळा, निगडे, गोडुंब्रे, भोयरे, देवले या गावांच्या ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले.

नागरिकांनी सकाळी साडेसात वाजल्या पासूनच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. या आठ गावांच्या ग्रामपंचायतीसाठी एकूण 14 हजार 577 मतदान होते, यापैकी एकूण 11 हजार 632 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 5 हजार 601 महिला व 6 हजार 31 पुरुष मतदारांचा समावेश आहे. इंदोरी ग्रामपंचायतच्या सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या असून फक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली, सरपंच पदासाठी शशिकांत शिंदे, अंकुश ढोरे व मधुकर ढोरे या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. या चुरशीच्या लढतीत 70 टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता आहे. भोयरे ग्रामपंचायत साठी सर्वाधिक 93.92 टक्के व निगडे ग्रामपंचायत साठी 93.10 टक्के मतदान झाले आहे.

Back to top button