पिंपरी : विदेशातील सफरचंदाची मोठी आवक | पुढारी

पिंपरी : विदेशातील सफरचंदाची मोठी आवक

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजारात इराण, तुर्की, चिली व न्यूझीलंड या देशामधून सफरचंदाची मोठया प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे काश्मिरी डिलीशिअस सफरचंदाची मागणी घटली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. तसेच हिवाळा सुरू झाला असून, उत्तम आरोग्यासाठी नागरिक फळांचे सेवन करण्यास पसंती दर्शवित आहेत. यामध्ये सफरचंद खाणे सर्वांनाच आवडते. मात्र सफरचंद निवडताना गोड, रसरशीत आणि कडक सफरचंदाची खरेदी करतात.

बाजारामध्ये सिमला सफरचंद दिवाळीपर्यंतच उपलब्ध असते. तेे चवीला गोड आणि कडक असते. बाजारात काश्मिरी डिलीशिअस सफरचंद उपलब्ध आहे. तेे नरम आणि कमी गोड असल्याने ग्राहकांची पसंती कमी असल्याचे विक्रेते सांगतात.
विदेशी सफरचंद जास्त काळ टिकते. देशी सफरचंदापेक्षा विदेशी सफरचंद आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकून राहते. तसेच ते बाजारात विक्रीस आणताना कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समधून मिळत असल्याने तेे अधिक काळ टिकते.

बाजारात विदेशातून आयात केलेल्या सफरचंदांना अधिक मागणी आहे. हिवाळा सुरू झाल्याने मागणी वाढली आहे. तसेच मार्गशीर्ष महिना असल्याने घरोघरी व्रत असते. त्यामुळे फळांमध्ये सफरचंदाला अधिक मागणी आहे. रसरसीत, गोड व टणक असलेल्या सफरचंदाला विशेष मागणी आहे.
                                                     – मनोज मुलाणी, फळविक्रेता, पिंपरी.

Back to top button