तळेगाव ढमढेरे : ओढ्यातून वाहते दुर्गंधीयुक्त पाणी; दुर्गंधीने नागरिक त्रासले | पुढारी

तळेगाव ढमढेरे : ओढ्यातून वाहते दुर्गंधीयुक्त पाणी; दुर्गंधीने नागरिक त्रासले

जालिंदर आदक

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर): तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावरील फरशीच्या ओढ्याच्या दूषित पाण्याने आणि टाकलेल्या कचर्‍यामुळे परिसरात घाण साचली आहे. दूषित पाण्याची दुर्गंधी दूरपर्यंत येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तळेगाव ढमढेरे परिसरात विविध प्रकारच्या कंपन्या आणि मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले असून, त्यामार्फत होणार्‍या प्रदूषणाची धग वाढत चालली आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरली आहे.

रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही. तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावरील फरशीच्या ओढ्याभोवती प्लास्टिक, टाकाऊ कचरा एकवटून त्याचा व त्यातून साचलेल्या दूषित पाण्याची दुर्गंधी येत असून, येथील प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. शेजारीच राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.

जगामध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना महारोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी डेंग्यू, मलेरिया, पेशी कमी होणे किंवा जास्त होणे अशा विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या भागात झपाट्याने वाढत चाललेली रहदारी आणि औद्योगिक वसाहती आहेत. येथील रहदारीतील प्रत्येक कुटुंबातील सांडपाणी या ओढ्याच्या माध्यमातून वेळ नदीला सोडले जाते. यावर स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असताना दिसत आहे. रापलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी दूरवर येत असल्याने प्रवाशांना नाकाला रूमाल लावून प्रवास करावा लागत आहे.

भगदाड पडल्याने अपघाताचा धोका

तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यावर असलेल्या फरशीच्या ओढ्यावरील छोट्या पुलाचा एक भाग वाहून गेला असल्यामुळे मोठे भगदाड पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

शिक्रापूर हद्दीतील गृहप्रकल्प सोसायटीचे सांडपाणी या ओढ्याला सोडले जाते. तसेच या भागातील मोठ्या गृहप्रकल्प सोसायटीला आणि कंपन्यांना आणि प्रदूषण महामंडळ यांना लवकरच पत्रव्यवहार करणार आहे.
                                                                    – बापूसाहेब गोरे,
                                                   ग्रामविकास अधिकारी, तळेगाव ढमढरे

 

Back to top button