पिंपरी : हिंदू जनगर्जना मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय | पुढारी

पिंपरी : हिंदू जनगर्जना मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाकडून विविध मागण्यांसाठी रविवार(दि. 18) हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायदा अंमलात आणावा आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक येथून सुरु झालेला हा मोर्चा पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरापर्यंत काढण्यात आला. चिंचवड येथून रविवारी सकाळी दहा वाजता या मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी- चिंचवडसह निगडी, चिखली, प्राधिकरण, देहू, आळंदी, देहूरोड, हिंजवडी, गहुंजे येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे, प्रतिष्ठान यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता.

वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारी मुले देखील या मोर्चात सहभागी झाली होती. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा घेऊन तरुण मोर्चात सहभागी झाले होते. पिंपरी- चिंचवड शहरात पहिल्यांदाच सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा झाला आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर यांच्या हत्येतील  आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा विविध मागण्या विराट मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चा जात असलेल्या मार्गावरून दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत मोर्चाला समर्थन दिले.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक येथून निघालेला हा मोर्चा पुणे-मुंबई जुन्या महामार्गाने पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहचला. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या पुतळ्याला, स्मारकाला अभिवादन करून मोर्चा पुढे सरकत होता. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आले. त्यानंतर पुतळ्याजवळील प्रांगणात सभा होऊन मोर्चा संपला. समारोपप्रसंगी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करुन लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदीसाठी लवकरात लवकर कायदे करण्याची मागणी केली. मोर्चामुळे विविध मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गावरुन वळविण्यात
आली होती.

Back to top button