पुणे : अद्वितीय आविष्कार; सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा सुरेल समारोप | पुढारी

पुणे : अद्वितीय आविष्कार; सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा सुरेल समारोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पं. आनंद भाटे अन् राजेंद्र कंदलगावकर या शिष्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना गायनातून दिलेली मानवंदना… राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरीच्या स्वरांनी ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसात सुरेल रंग भरले… तर गायक महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी-कर्नाटक संगीताच्या जुगलबंदीने सुरांची बरसात केली अन् संगीताला कोणतीही सीमा नसते, याची प्रचिती दिली. महोत्सवात पहिल्यांदाच सादरीकरण करणार्‍या अर्चना जोगळेकर यांच्या कथक नृत्याविष्काराने रसिकांची दाद मिळवली. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा शेवटचा दिवस खास बनला. सवाई गंधर्व यांच्या आवाजातील भैरवीतील ध्वनिमुद्रिका ऐकवून महोत्सवाचा रविवारी (दि. 18) समारोप झाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 68 व्या ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा शेवटचा दिवस रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता करण्याची रीत आहे. पण, 2019 मध्ये झालेल्या महोत्सवात प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होऊ शकली नाही. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा डॉ. अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सुरेल सांगता झाल्याने रसिकांमध्येही आनंद पाहायला मिळाला. त्यांच्या गायनाला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. डॉ. अत्रे यांचे गायन शेवटच्या दिवसाचे आकर्षण ठरले.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात पं. आनंद भाटे यांच्या गायनाने झाली. राग वृंदावनी सारंगने त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी विलंबित लयीत ”तुम रब तुम साहेब” ही बंदिश, तर द्रुत लयीत ”जाऊ मैं तोपे बलिहारी” ही बंदिश सादर केली. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ”राम रंगी रंगले मन” ही भक्तिरचना सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन दिग्गजांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा ”बाजे मुरलिया बाजे” या गीताच्या दमदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर ”झाले युवतीमना…” हे पद सादर करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यानंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग अल्हैया बिलावलद्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये विलंबित आणि द्रुत गत सादर करीत हळुवारपणे या रागाची उकल केली. त्यानंतर पहाडी धून सादर करीत बनारसी दादराच्या प्रस्तुतीने आपल्या वादनाचा समारोप केला.

तिसर्‍या सत्रात राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन झाले. ‘गुरुजींनी फार कष्ठाने हा कल्पवृक्ष जोपासला आहे. त्या कल्पवृक्षाच्या छत्रछायेत आज आम्ही सर्व कलाकार वृद्धिंगत होत आहोत. कोरोनाकाळात ही पंढरीची वारी चुकली. पण, आता ती पुन्हा सुरू झाली आहे आणि याचा आनंद होत आहे,‘ असे सांगत त्यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरुवात केली.

त्यामध्ये ”अब तो भई तेर… ” ही विलंबित बंदिश, ” मिल जाना राम पियारे… ” ही तीन तालातील बंदिश, त्यानंतर ”कटे ना अब बिरहा की रात…” ही पिलू रागातील ठुमरी सादर केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या ”भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..” या लोकप्रिय भजन प्रस्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

चौथ्या सत्रात घट्टम, मृदंग अशा विविध तालवाद्द्यांच्या तडफदार साथीने रंगलेल्या हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले होते. महेश काळे व संदीप नारायण यांनी सादर केलेल्या या जुगलबंदीला तरुण श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांनी धानी रागाने आपल्या गायनाची सुरुवात केली. यामध्ये ”देवी ब—ोवा समयमी दे…” ही कर्नाटक संगीतातील बंदिश, ”लंगरवा छंड मोरी बैया…” ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश, जलद लयीत ”मोरे सर से सरक गई गगरी…” ही मिश्रबंदिश आणि तराणा सादर केला.

त्यानंतर ”कृष्णानी बेगडी बारू” हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. ’कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग दोघांनीही सादर करून वातावरण भक्तिमय करून मैफलीची सांगता केली. रसिकांनी उभे राहून दोघांना दाद दिली. पाचव्या सत्रात नृत्य कलाकार आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

त्यांनी सादर केलेल्या श्रीरामस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक आणि धमार ताल प्रस्तुृत केला, तसेच दोन स्वरचित रचना त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा ”श्रीराम कथा” सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला.

महोत्सवाचा शेवट डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाला. त्यांच्या गायकीची स्वरानुभूती रसिकांना आनंद देऊन गेली. त्यांनी राग भैरवी सादर केला. ’जगत जननी भवतारिणी, मोहिनी तू नवदुर्गा’ या रचनेने त्यांनी समारोप केला.

मिरजकर बंधूंकडून तानपुरे भेट
मिरज येथील बाळासाहेब मिरजकर व साजिद मिरजकर या मिरजकर बंधूंकडून आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याकडे दोन विशेष तानपुरे सुपूर्त करण्यात आले. या तानपुर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तबकडी-गळा-दांडी या एकसंध स्वरूपात असून, यांच्या तळाशी कुठेही जोड नाही. अतिशय अनोखी रचना असलेल्या या तानपुर्‍यांच्या निर्मितीसाठी एक वर्षाचा कालावधी लागला.

पंधरा वर्षांनंतर एकत्र
पंडित भीमसेन जोशी हे सहस्र वर्षांत एकदाच घडणार्‍या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ’सवाई’मध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. मात्र,
आज तब्बल 15 वर्षांनंतर एकत्र गायलो, असे महेश काळे यांनी सांगितले.

‘संगीत हे केवळ शास्त्र नाही, कसरत, करामत अथवा मनोरंजन नाही; तर या जगातील सुंदर, मंगल शाश्वत जे आहे, त्याची जाणीव करून देणारे माध्यम आहे. संगीतपरंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करीत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण, त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला खात्री आहे.

                                                      – डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

Back to top button