आंबेगावला बटाटा काढणीची लगबग | पुढारी

आंबेगावला बटाटा काढणीची लगबग

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाज, देवगाव, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, लाखणगाव, लोणी आदी गावांमध्ये बटाटा काढणीची लगबग सुरू आहे. या हंगामात बटाट्याचे चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

बटाटा काढण्यासाठी मंजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकर्‍यांची धावपळ होत आहे. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हे तालुके बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. सध्या बटाटा हे पीक परिपक्व झाले असून, शेतकरी लाकडी नांगराचा वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतला जातो. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. काही शेतकरी शीतगृहात साठवून ठेवत असतात.

काही कंपन्या काढलेला बटाटा शेतातच विकत घेतात. बटाटा काढण्यासाठी मजुरांची वानवा जाणवत असल्याने जादा पैसे देऊन मजूर परगावाहून वाहनांची व्यवस्था करून आणावे लागत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत आहे. सध्या बटाट्याला किलोमागे 18 ते 23 रुपयांचा भाव मिळत असल्याचे मेंगडेवाडी येथील बटाटा उत्पादक शेतकरी यशवंत टाव्हरे व हनुमंत टाव्हरे यांनी सांगितले आहे.

Back to top button