

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : भूखंड खरेदी करून मूळ मालकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हवेली पंचायत समितीचे सदस्य श्याम गावडे यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमलता बाबासाहेब जासूद व बाबासाहेब जासूद यांनी याबाबत तक्रार दिली आहे. हेमलता जासूद व बाबासाहेब जासूद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाभुळसर खुर्द येथील गट नंबर 521 च्या सातबारा उतार्यावर एमआयडीसी (MIDC) संपादित इतर हक्कातील शेरा काढून जमीन विकत घेतो, असा जमीनमालक हेमलता बाबासाहेब जासूद यांचा विश्वास श्याम गावडे याने संपादन केला.
त्यानंतर बाभुळसर खुर्द येथील गट नं. 521 क्षेत्र 00.95 आर हे संपूर्ण क्षेत्राचे साठेखत दस्त 3020/2017 दिनांक 24/05/2017 व कुलमुखत्यार दस्त 3221/2017 दिनांक 24/05/2017 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे करून घेतले. साठेखतामध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये असे वेगवेगळ्या तारखांचे वेगवेगळे चेक गावडे याने दिनांक टाकून दिले. परंतु, हे चेक बँकेतून न वटवता कुलमुखत्यारधारक श्याम परिमल गावडे याने गट नंबर 521 च्या सातबारा उतार्यावर एमआयडीसी (MIDC) संपादित शेरा असूनसुद्धा परस्पर जमीन दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे दस्त 4817/2017 नुसार दिनांक 10/08/2017 रोजी स्वतः च्या नावाने खरेदी केली.
7/12 उतार्यावर त्याच्या नावाची नोंद नसताना या भूखंडाचा एक-एक गुंठा बेकायदेशीररीत्या 30 वेगवेगळ्या जणांना विकला आहे. जमीनमालकाचा विश्वास संपादन करून व्यवहार पूर्ण न करता कुलमुखत्यारधारकाने परस्पर जमीन स्वतःच्या नावाने खरेदी केली. त्यानंतर या भूखंडाचे एक-एक गुंठ्याचे बेकायदेशीर प्लॉटिंग केल्यानंतर विक्री करून मूळ मालकाची व प्लॉट घेणार्यांची लाखो रुपयांची फसवणूक शक्यता आहे. याबाबतचा तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.