पुणे : वन विभाग परीक्षा ऑनलाईनच | पुढारी

पुणे : वन विभाग परीक्षा ऑनलाईनच

गणेश खळदकर

पुणे : वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.

तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम
सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

वनरक्षक भरतीमध्ये विद्यार्थ्यांना दोन वर्षे वय वाढवून देण्यात यावे. कोरोना काळात दोन वर्षांत परीक्षा झाली नसल्यामुळे अनेक परीक्षार्थींची वयोमर्यादा संपलेली आहे. त्यामुळे वय वाढवून दिल्यास परीक्षार्थींना न्याय मिळेल.
                                                                 – महेश घरबुडे,
                                                कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Back to top button