पुणे : ‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गुन्हे मागे घ्या : राज्यमंत्री रामदास आठवले | पुढारी

पुणे : ‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गुन्हे मागे घ्या : राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले, त्याप्रामाणेच कोरेगाव भीमा प्रकरणातीलही गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.18) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आठवले म्हणाले, ‘1 जानेवारीला कोरेगाव भीमा हा संघर्षशील दिवस असून, याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती. महार समाजाच्या इतिहासाची ती आठवण आहे. लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी अभिवादनासाठी येतात. आधी केवळ आमचीच सभा तिथे होत होती, परंतु आता अनेक जण सभा घेत आहेत. मात्र, आता प्रशासनाने त्या परिसरात सभा घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पंरतु स्तंभ परिसराच्या बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या.’

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आठवले म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. पण, त्यांच्या त्या वक्तव्याशी कुणीही सहमत नाही. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला, त्यामुळे लोकांचा रोष आहे. मात्र, त्यांनी आता माफी मागितली आहे.’ शाईफेक प्रकरणात संशयितांवर लावलेले कलम 307 मागे घ्यावे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यानंतर ते कलम मागे घेण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.

समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा असून, हा कायदा कुठल्याही धर्माविरोधात नाही. लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे. समान नागरी कायद्यामुळे आरक्षण जाणार हे म्हणणं चुकीचं आहे. आणि जर आरक्षण गेलं तर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. पण, यामुळे आरक्षण जाणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत राहावी. भारत जोडण्याची आवश्यकता नाही, बाबासाहेबांनी संविधानाने तो जोडलेला आहे. काँग्रेसकडे सत्ता होती. मात्र, त्यांना गांधी, बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी होती, पण ती त्यांनी नाही केली. काँग्रेसने भारत जोडला नाही, म्हणून राहुल गांधी यांच्यावर ही वेळ आली. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

…तर ‘पठाण’ चित्रपटाला विरोध
‘पठाण’ चित्रपटाला आमचा विरोध नाही. पण, चित्रपटात भगव्या रंगाला बेशरम रंग अस गाणं आणि वक्तव्य आहे. भगवा रंग हा जसा भाजप-शिवसेना यांचा आहे, तसाच आमच्या गौतम बुद्धांच्या विचाराचा रंगदेखील भगवा आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी हा रंग शांततेचा रंग म्हणून पुढे आणण्यात आला. हा आमच्या बौद्ध धर्माचा देखील अपमान आहे. या चित्रपटातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे; अन्यथा आमचा पक्षदेखील या चित्रपटाविरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असे आठवले म्हणाले.

 

Back to top button