पुणे : 221 ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात 81 टक्के मतदान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणार्या 221 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सरपंचपदाच्या 167, तर सदस्यपदाच्या 1062 जागांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 80.79 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील तेरापैकी अकरा तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. निवडणूक जाहीर झालेल्या 221 पैकी 27 ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचाची निवड थेट केली जात असून, 49 ग्रामपंचायतींचे सरपंचही बिनविरोध
निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही.
त्यामुळे ही पदे रिक्त आहेत. एकूण सरपंचपदाच्या 167 जागांसाठी मतदान झाले. मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्त्री मतदारांची संख्या 1 लाख 47 हजार 998 होती, तर पुरुष मतदार 1 लाख 55 हजार 590 आहेत. सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत 54.08 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 70.60 टक्के मतदान झाले. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार एकूण मतदारांपैकी 2 लाख 45 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.
तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी (दि. 20 डिसेंबर) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे, तर 23 डिसेंबरला तहसीलदार निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. बारामती तालुक्यातील 66, इंदापूर 26, दौंड 8, शिरूर 4 आणि हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. या तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली नाही. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.
तालुकानिहाय मतदान झालेल्या ग्रामपंचायती
वेल्हा तालुक्यातील 28 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे 25 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. भोरमधील सर्वाधिक 54 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. त्यातील तब्बल 24 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे उर्वरित 30 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.
जुन्नर तालुक्यातील 17 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, 13 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आंबेगावमध्ये 21 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. खेडमध्ये 23 पैकी 21 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले, तर 2 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. मावळमध्ये 9 पैकी 8 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मुळशीत 11 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. त्यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.