आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी हिंदू दहशतवाद संकल्पनेचा जन्म : लेखिका स्मिता मिश्रा | पुढारी

आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी हिंदू दहशतवाद संकल्पनेचा जन्म : लेखिका स्मिता मिश्रा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : तात्पुरत्या राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांनी राष्ट्राचे दिर्घकालीन नुकसान करुन ठेवले आहे. २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील, भारतीय लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा चेहरा वापरून आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी हिंदू दहशतवाद ही खोटी संकल्पना मांडली गेली, असे मत लेखिका स्मिता मिश्रा यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुण्यातील टिळक रोडवर असलेल्या लेडी रमाबाई हॉल मध्ये पुण्याचे माजी पोलीस आयुक्त निवृत्त डीजीपी जयंत उमराणीकर यांच्या हस्ते ‘कर्नल पुरोहित द मॅन बेटरेड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी लेखिका मिश्रा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रकाशिका रेणू कौल वर्मा उपस्थित होत्या. संवादात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले. यावेळी सीए रणजीत नातू, सीए धनंजय बर्वे आणि प्रसाद पुरंदरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लेखिका  मिश्रा म्हणाल्या, हे पुस्तक लिहून मला काय मिळाले, मी हे पुस्तक लिहलेच नसते तर काय फरक पडला असता असे अनेक प्रश्न मला विचारले गेले. परंतु मी हे पुस्तक लिहले नसते तर हिंदू दहशतवाद ही एक संकल्पना खरच अस्तित्वात होती, असा पुढील पिढीचा भ्रम झाला असता, हा भ्रम होऊ नये आणि त्यासाठी योग्य साहित्य आणि दस्तावेज त्यांच्या मदतीसाठी हाताशी असावा म्हणून मी हे पुस्तक लिहिले. अनेक पातळ्यांवर मी दबाव आणि दहशत सहन केली.

माझ्या जीवाचे काही बरे-वाईट होण्याआधीच मला हिंदू दहशतवाद ही खोटी संकल्पना स-प्रमाण खो़डून काढायची होती. हिंदू दहशतवाद नावाची संकल्पना अस्तित्वात नसताना एकच खोटे सातत्याने सांगितल्याने येणा-या पिढीला कदाचित ही संकल्पना खरी देखील वाटू शकली असती. माध्यमांनी देखील जबाबदारीचे भान बाळगणे आवश्यक असून ब्रेकिंग देण्याच्या नादात आपण काही चुकीचे तर देत नाही आहोत ना याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

निवृत्त डीजीपी उमराणीकर म्हणाले, पोलिसांना अधिकार दिले परंतु, त्या अधिकाराच्या अंमलबजावणीत अनेक कायदेशीर अडथळे निर्माण करुन ठेवले आहेत. राजकारणी आणि सर्वसामान्य जनता या कात्रीत तो सापडला असून पोलिसांना अधिकार वापरण्यात थोडे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button