पिंपरी : दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांचा उद्यानात टाईमपास | पुढारी

पिंपरी : दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांचा उद्यानात टाईमपास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरणातील श्री संत तुकाराम उद्यानात फिरायला येणार्‍यांपेक्षा शाळा, कॉलेजला दांडी मारून टाईमपास करायला येणार्‍या विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांच्या वाढत्या त्रासामुळे येथे फिरायला येणार्‍या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्राधिकरणातील श्री संत तुकाराम उद्यानात सकाळी तसेच सायंकाळी विरंगुळ्यासाठी येणार्‍यांची मोठी वर्दळ असते. उद्यानामध्ये शाळेला तसेच कॉलेजला दांडी मारून याठिकाणी टाईमपास करण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची गर्दी असते. यामध्ये विद्यार्थिनींचेदेखील प्रमाण जास्त आहे. उद्यानांतील बाकड्यांवर फक्त मुले- मुलीच बसून असल्याचे दिसून येते.

सकाळी 7 नंतर ‘यांचेच’ राज्य

या ठिकाणी आलेले हे टारगट विद्यार्थी कोणालाच जुमानत नाहीत, कोणी हटकल्यास हमरीतुमरीवर येतात. धमक्या देण्याचे प्रकारही घडले असल्याचे याठिकाणी येणार्‍या नागरिकांनी सांगितले. दररोज व्यायामाला येणारे नागरिक त्यांच्याकडे कानाडोळा करतात. या उद्यानात असणार्‍या ’वॉचमन’लादेखील ही मुले धमक्या देतात. त्यांना हटकल्यास जुमानत नसल्याचे नागरिक सांगतात.

संत तुकाराम उद्यानात येण्यासाठी दोन बाजूस प्रवेशद्वार आहेत. या ठिकाणी टाईमपाससाठी येणारी मुले मागील बाजूच्या प्रवेशद्वारातून येतात; तसेच याठिकाणी उद्यान बंद होईपर्यंत याठिकाणी ठाण मांडून बसतात. त्यामुळे ते प्रवेशद्वार बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या संदर्भात पिंपरी चिंचवडचे उपायुक्त संदीप खोत व प्रशासन अधिकारी संजय नायकडे यांना फोनवर संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

मी ‘भाई’चा माणूस…
संत तुकाराम उद्यानात येणार्‍या नागरिकांनी या विद्यार्थ्यांना हटकल्यास किंवा विचारणा केल्यास मी ’भाई’चा माणूस आहे. अशी भाषा करत असल्याचे येथे फिरावयास येणारे नागरिक सांगतात.

महापालिकेचा नाही वॉचमेन
आधी येथे महापालिकेचा वॉचमेन होता तो दुसरीकडे शिफ्ट केला. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमलेल्या वॉचमेनला कोणी जुमानत नाही. महापालिकेचा वॉचमेन ठेवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Back to top button