पुणे : शेती पंपासाठी वीजजोड देण्याला महावितरणकडून वेग | पुढारी

पुणे : शेती पंपासाठी वीजजोड देण्याला महावितरणकडून वेग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने नियोजनपूर्वक गतिमान कारवाई केली असून, केवळ दीड महिन्यात 27 हजार 980 नवी कनेक्शन दिली आहेत. शेतकर्‍यांच्या ’पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण वेगाने प्रयत्न करत आहे.

महावितरणने 31 मार्च 2022 अखेर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित 1 लाख 80 हजार 106 अर्जांपैकी 82 हजार 584 कनेक्शन एप्रिल 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत दिली आहेत. यापैकी मागील दीड महिन्यांत 27 हजार 980 जोडण्या दिल्या आहेत. महावितरणचे याबाबत केलेले नियोजन पूर्ण झाले असून, अंमलबजावणीची गती वाढल्यामुळे नवीन कृषी पंप कनेक्शन देण्याचा वेग वाढला आहे. महावितरण या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत आणखी 1 लाख पंप जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे अर्ज नव्याने दाखल होत आहेत. पण त्याचवेळी महावितरण पेड पेंडिंगचा प्रश्न सोडवून शेतकर्‍यांना प्राधान्याने नवी कनेक्शन देत आहे. परिणामी कृषी पंपांसाठी वीज जोडणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांची संख्या कमी होत आहे.

Back to top button