राजगुरुनगर : आमदार मोहितेमुळे तालुका दहशतीखाली : माजी सभापती पोखरकर यांची टीका | पुढारी

राजगुरुनगर : आमदार मोहितेमुळे तालुका दहशतीखाली : माजी सभापती पोखरकर यांची टीका

राजगुरुनगर (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : दिलीप मोहिते आमदार झाल्यापासून खेड तालुक्यात पुन्हा गुंडगिरी बोकाळली आहे. असे माजी सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले. जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या खेड तालुका पंचायत समिती इमारतीच्या कामाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून सूडबुद्धीने त्यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर भूमिपूजन झालेले काम बंद पाडले. तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांना खोटी माहिती देऊन जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर दबाव आणत अडीच वर्षे हे काम थांबवण्याचा घाट मोहिते यांनी घातला.

मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आम्हाला सोबत घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन या ठिकाणी तब्बल १६ कोटींची पंचायत समिती इमारत मंजूर करून घेतली. आमदार मोहितेंच्या निष्क्रियतेमुळे बासनात गुंडाळल्या गेलेल्या चाकण उपजिल्हा रुग्णालयास देखील आढळराव पाटील यांनी मंजुरी मिळवली. इतकेच नव्हे तर खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्र यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन राजगुरुनगर शहरातील योग्य जागा निश्चित करण्याची आग्रही मागणी केली.

या सगळ्या कामांच्या धडाक्यामुळे पोटशुळ उठलेल्या आमदार मोहिते यांनी स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठीच खेड तालुक्यातील जनतेला खोटी माहिती देत फसवणुकीचे उद्योग सुरू केले आहेत. पण खोटं कोण बोलतंय आणि प्रामाणिकपणे कामे कोण करत आहे हे लोकांना स्पष्ट दिसत आहे. असेही पोखरकर यांनी सांगितले, ते म्हणाले इतकी वर्ष खेड तालुक्याला या निष्क्रिय आमदाराने लुटले होते. मात्र गुंडगिरीच्या जोरावर लोक यांच्याविरुद्ध बोलायला धजावत नव्हते. आढळराव पाटील यांनी मात्र मोहितेंचे सगळे काळे उद्योग बाहेर काढणार असल्याचे जाहीर केल्यामुळेच आढळराव पाटील यांची मला भीती वाटत असल्याची कबुली मोहिते सभांमध्ये देऊ लागले असल्याचेही भगवान पोखरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दिलीप मोहिते यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व पूर्णपणे खोटे असून माझ्यावर पोस्को अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करावे अन्यथा माझी जाहीर माफी मागावी. त्यांनी तसे न केल्यास मी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही भगवान पोखरकर यांनी यावेळी सांगितले.

Back to top button