

चाकण; पुढारी वृत्तसेवा : लम्पी आजाराचा संसर्ग कमी झाल्याने काही गुरांची खरेदी-विक्री पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील मोठा गुरांचा बाजार मानल्या जाणार्या चाकण (ता. खेड) येथील गुरांच्या बाजाराला संबंधित अधिकार्यांनी परवानगी दिल्यामुळे शनिवार (दि. 17) पासून हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या येथे केवळ म्हशींची खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. लम्पी आजाराचे संकट निर्माण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील सुमारे तीन महिने जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
गुरांना होणारा लम्पी आजार संसर्गजन्य असल्याने याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने दिले होते. त्यामुळे 10 सप्टेंबरपासून म्हणजे सुमारे तीन महिने चाकण येथील गाय, बैल, म्हैस, रेडे यांचा बाजार बंद होता.
केवळ शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरू होता. शनिवारपासून हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला असून, केवळ म्हशींची खरेदी-विक्री येथे सुरी करण्यास परवागी मिळाल्याने म्हैस व शेळ्यांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. गाय-बैल या गुरांचा बाजार मात्र अद्याप बंदच असल्याने शेतकर्यांचा पशुसंवर्धनाचा जोड व्यवसाय अद्यापही अडचणीतच असल्याची शेतकर्यांची भावना आहे. शनिवारी चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेल्या 90 म्हशींपैकी 60 म्हशींची विक्री होऊन 25 हजार ते 40 हजार रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.