पुणे : कुरिअरद्वारे ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री; दोघांना पकडले | पुढारी

पुणे : कुरिअरद्वारे ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री; दोघांना पकडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुरिअरद्वारे गांजा व चरसची ऑनलाइन विक्री करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-1 ने अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो गांजा व 104 ग्रॅम चरस असा 3 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षद दत्तात्रय इंगळे (वय 21, रा. दापोडी), भागवत शेषनारायण सुरनर (वय 20, रा. बावधन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी विशाल शिंदे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, पुणे-बंगळुरू सनसिटी हायवे बायपास परिसरात ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघे येणार आहेत. त्यानुसार पथकाने साध्या वेशात सापळा लावला होता. दोघे संशयित दुचाकी घेऊन संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे त्यांना दिसून आले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील मालाची तपासणी केली तेव्हा अगदी एखाद्या कंपनीकडून येणारे कुरिअर कसे असते, तशा प्रकारे त्याची पॅकिंग केल्याचे काही पुडे मिळून आले. पोलिसांनी ते फोडले तेव्हा त्यामध्ये चरस आणि गांजा मिळून आला.

त्यांचा मुख्य सूत्रधार हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तो शहरातील तरुणांना फोनद्वारे ऑनलाइन माध्यमातून अमली पदार्थ विक्रीसाठी संपर्क साधतो. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या तरुणांना कुरिअरप्रमाणे माल पॅक करून डिलिव्हरी देण्यासाठी पाठवून देतो. त्यामुळे पोलिसांना देखील संशय येत नव्हता. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, कर्मचारी विशाल शिंदे, योगेश मोहिते, प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन पाळवदे, मारुती पारधी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button