..म्हणून मी फेसशिल्ड घालून आलोय! चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण | पुढारी

..म्हणून मी फेसशिल्ड घालून आलोय! चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: माझा पोलिस आणि कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, माझ्या अंगावर शाई फेकल्याने एखाद्याला आनंद मिळणार असेल, तर त्यासाठी मी फेसशिल्ड लावून आलोय. अंगावर शाई फेकल्यानंतर किमान माझा डोळा तरी वाचावा, हा या मागचा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित पवनाथडी जत्रेला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाई फेकण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील कडेकोट पहाऱ्यात शनिवारी (दि. १७) सांगवी येथे पवनाथडी जत्रेला भेट देण्यासाठी आले. त्या वेळी पाटील यांच्या चेहऱ्यावर चक्क फेसशिल्ड दिसून आले. त्यांच्या या फेसशिल्डची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच याबाबतचे स्पष्टीकरण देऊन चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी घेतली विशेष खबरदारी :

मागील आठवड्यात १० डिसेंबर रोजी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यामुळे पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले. पोलिस नागरिकांसह भाजप कार्यकर्त्यांची तपासणी करूनच आत सोडत होते.

Back to top button