बेल्हे : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता छुप्या पद्धतीने प्रचार | पुढारी

बेल्हे : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता छुप्या पद्धतीने प्रचार

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 10 दिवसांपासून सभा, पदयात्रा, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपाने साकोरी, आणे, पारगाव ही गावे ढवळून निघाली आहे. एकमेकांविरोधात धडाडणार्‍या डिजिटल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, छुप्या पद्धतीने प्रचार सुरू झाला आहे. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 18) मतदान होणार आहे. त्याबाबत उमेदवारांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

आणे, पारगाव तर्फे आळे, साकोरी येथे चार प्रभागांतून 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काही राजकीय पक्षाचे दिगग्ज उमेदवार रिंगणात आहेत. येथील जिल्हा परिषद व महाविद्यालयातील केंद्रावर मतदार मतदान करणार आहेत. मतदानाच्या 48 तास अगोदर प्रचार थांबवणे बंधनकारक असल्याने शुक्रवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. आता खर्‍या अर्थाने छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी स्वतःची वेगळी प्रचारयंत्रणा राबवावी लागली आहे.

गावात जोरदार प्रचार करण्यात आला. सोशल मीडियासह गल्लीबोळातून प्रचाराची वाहने फिरत होती तसेच जाहीर सभांतून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडत होत्या. या प्रचारयुद्धास अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. राजकीय नेतेमंडळींचे या निवडणुकीकडे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने लक्ष आहे. ग्रामपंचायत सदस्य निवडीकडे विशेष लक्ष आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार सदस्यपदी विराजमान होतो, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असल्याने नेते मंडळींकडून या निवडणुकीतील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.

पोलिस-उमेदवारांमध्ये शांततेबाबत चर्चा
निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली असली, तरी यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी उमेदवारांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. सर्वच उमेदवार व कार्यकर्त्यांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Back to top button