वडगाव मावळ : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पालकमंत्र्यांवर वेळ ; आमदार सुनील शेळके यांची टीका | पुढारी

वडगाव मावळ : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पालकमंत्र्यांवर वेळ ; आमदार सुनील शेळके यांची टीका

वडगाव मावळ : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदर मावळ भागातील भोयरे व निगडे या गावांना भेट दिली. दरम्यान, तेथील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पालकमंत्र्यांनी भेट दिल्याने पालकमंत्र्यांवर ग्रामपंचायत प्रचाराला येण्याची वेळ आली आहे, असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना केला.

भेगडे कुटुंबीयांची घेतली भेट
पालकमंत्री पाटील यांनी दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या निवासस्थानी कुंडमळा येथे सांत्वन भेट दिली, त्यानंतर त्यांनी आंदरमावळ भागाचा दौरा करून निगडे व भोयरे या गावांना भेट दिली. संबंधित दोन्ही गावांची ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील हे मावळात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असल्याचा आरोप करून भाजपचा बालेकिल्ला म्हणवणार्‍यांना आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांना आणण्याची वेळ आली आहे, अशी टीका आमदार शेळके यांनी केली.

सत्तेत येताच 130 कोटींच्या विकासकामांना स्थगिती

सत्तेवर आले आणि महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या 130 कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली आणि आता तेच तुमची सगळी कामे मार्गी लावू असे सांगत मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शेळके यांनी केला. तसेच, भाजपचा बालेकिल्ला म्हणणार्‍यांनी मावळवासीयांची विश्वासार्हता गमावली असून, गेल्या तीन वर्षांत सातत्याने अपयश येत असल्याने राज्यातील नेते आणून लोकांची समजूत घालावी लागत आहे, अशी टीकाही शेळके यांनी केली.

पालकमंत्री उमेदवार असतील तर नवल वाटायला नको !

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याचे  पालकमंत्री चंद्रकांत पाटील येत  असतील, तर आगामी सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच मावळ विधानसभेचे उमेदवार असतील यात नवल वाटायला नको, अशी टिप्पणी आमदार सुनील शेळके यांनी या वेळी केली आहे.

Back to top button