भाजपच्या दबावामुळे भूमिपूजन कार्यक्रम रद्द : आ. अशोक पवार यांचा गंभीर आरोप | पुढारी

भाजपच्या दबावामुळे भूमिपूजन कार्यक्रम रद्द : आ. अशोक पवार यांचा गंभीर आरोप

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजप कार्यकर्ते यांनी आडकाठी आणल्यामुळे व अधिकार्‍यांना फोन करून बदली व निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन झाले नसल्याचा आरोप शिरूरचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भूमिपूजन न झाल्याने शहरातील अल्पोत्पन्न गटातील तरुणांना व्यवसायाकरिता उपलब्ध झालेली संधी काही दिवस पुढे गेल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुज्जफर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिरूर बसस्थानकाजवळील व्यापारी संकुलाचे शुक्रवारी (दि. 16) भूमिपूजन होणार होते. परंतु, ते रद्द झाले. त्यानंतर आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला. आ. पवार म्हणाले की, भाजपचे जिल्ह्याचे नेते धर्मेंद्र खांडरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अल्पोत्पन्न गटातील तरुणांना मिळणाऱ्या रोजगारामध्ये ’खो’ आणून प्रशासकीय पातळीवर सत्तेचा उपयोग केला.

अधिकारी यांच्यावर दबाव आणून त्यांनी जिल्ह्यासाठी एक वेगळा नियम करून घेतला आहे, हे योग्य नाही. या अगोदरही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाविकास आघाडीचे अजित पवार होते. त्यांच्या काळात अशी कुठलीही विकासकामांच्या भूमिपूजनात आडकाठी आणली नाही. परंतु, केवळ भाजपचे कार्यकर्ते यांनी सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे करून कार्यक्रम होऊ दिला नाही, असेही आमदार पवार म्हणाले.

या वेळी अ‍ॅड. पवार म्हणाले की, शिरूर शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांनी कोट्यवधींचा निधी आणावा, आम्ही त्याचे स्वागत करू. त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करा, त्याला आम्हाला बोलावले नाही, तरी चालेल. मात्र, नुसत्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे बंद करा. धर्मेंद्र खांडरे तुम्हाला अधिकार्‍यांना दमबाजी करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही आमदार अशोक पवार यांनी केला.

शिरूर तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 270 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यास प्रशासकीय मंजुरीही दिली होती. परंतु, या सरकारच्या काळामध्ये त्याला खीळ बसली असून, केवळ श्रेय घेण्यासाठी येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार शरद सोनवणे हे बैठका घेत असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला. पालकमंत्री एवढ्या छोट्या मनाचे नाहीत; परंतु शिरूर भाजपने ते घडवून आणल्याचा आरोप पवार यांनी केला.

शासकीय कार्यक्रम असला तर प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. पालकमंत्री यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेवर पाहिजे, तुम्ही ते पाळत नसाल तर ते राजशिष्टाचाराविरोधात असून, मी दमबाजी केली, अशी कुठल्याही अधिकार्‍यांची तक्रार नाही. अधिकार्‍यांनी तक्रार करावी, मी त्याचे उत्तर देईन. कुठलीही तक्रार नसताना शहानिशा न करता दुसर्‍याच्या सांगण्यावरून तथ्यहीन आरोप करणे हे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रवादीचा होता. तो रद्द करणे किंवा घेणे हा सर्वस्वी निर्णय हा त्या पक्षाचा आहे. याचा भाजपशी काही संबंध नाही.
                                         – धर्मेंद खांडरे, जिल्हा सरचिटणीस, भाजप

Back to top button