

भोर; पुढारी वृत्तसेवा : चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी करून प्राथमिक केंद्रास दिलेल्या रुग्णवाहिका गेल्या कुठे असा सवाल निगडे (ता. भोर) येथील दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. भोर तालुक्यातील 156 ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून तत्कालीन गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या संकल्पेतून अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प राबवून आंबवडे, नेरे, जोगवडी, भोंगवली, नसरापुर अशा पाच प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आल्या.
परंतु, निगडे येथे गुरुवारी (दि. 15) सकाळी गुंजवणी नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरून शाँक लागल्याने चार शेतकर्यांचा तडफडून मृत्यू झाला. दुर्घटनास्थळी तालुक्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी पोचले. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात आण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळू शकली नाही. अधिकारी, लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका गेल्या कोठे ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केल ाआहे. याबाबत संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
निगडे हे गाव सातारा महामार्गालगत आहे. या गावाच्या जवळच भोंगवली, जोगवडी, नसरापुर ही प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. असे असूनही रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेवर पोहचल्या नाहीत. त्यामुळे कुंटूंबियांना दुःखाबरोबर मानसिक त्रास सहन करावा लागला.
भोर तालुक्यातील ग्रामपंचायंतीनी आपल्या हक्काचा व स्वमालकीचा निधी ग्रामस्थांना वेळेत व चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा मिळाव्या यासाठी उपलब्ध करुन दिला.परंतु, त्याचा उपयोग होत नसल्याचे निगडे दुर्घटनेतून दिसून आले. 75 लाख रुपये खर्च करुन अद्ययावत रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध करुन दिल्या असताना आरोग्य विभागास त्यांची देखभाल सुध्दा करता येत नसल्याची बाब या निमीत्त समोर आली आहे.