मंचर : बैलगाडा शर्यतीमध्ये टोकनच्या नावाखाली लूट | पुढारी

मंचर : बैलगाडा शर्यतीमध्ये टोकनच्या नावाखाली लूट

संतोष वळसे पाटील

मंचर : बैलगाडा शर्यतींचा हंगाम राज्यात सुरू झाला आहे. परंतु, बैलगाडा शर्यतीमध्ये टोकनच्या नावाखाली काही यात्रा कमिट्या व्यवसाय करून बैलगाडामालकांचे आर्थिक शोषण करून लूट करीत आहेत. टोकनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जाते. परंतु, ही रक्कम परत दिली जात नसल्याने बैलगाडामालकांत नाराजी आहे. टोकनची रक्कम परत न देणार्‍या यात्रा कमिट्यां ना जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा परवानगी देऊ नये, अशी मागणी बैलगाडाप्रेमी मालकांकडून करण्यात आली आहे.

सध्या अनेक गावांमध्ये ठरावीक कार्यकर्ते एकत्र येऊन गावच्या दैवतांच्या नावाखाली यात्रा भरवत आहेत. ही यात्रा भरवत असताना बैलगाडामालकांकडून मोठ्या प्रमाणावर टोकनच्या नावाखाली 500 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत रक्कम गोळा केली जात आहे. ही गोळा केलेली रक्कम बैलगाडामालकांना बैलगाडा जुंपतेवेळी परत देणे अपेक्षित असते. परंतु, अनेक घाटांमध्ये ही रक्कम संबंधित कमिटी स्वतःकडे ठेवते. सध्यातर काही यात्रांमध्ये टोकन फी परत दिली जाणार नाही, अशी अट दिली जाते.

पैसे कमविण्यासाठी अनेक लोक यात्रा भरवू लागले आहेत. सध्या गावातील काही लोक देवाच्या नावाखाली यात्रा भरवून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू लागले आहेत. सध्या टोकन फीमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न काही लोक कमवू लागले आहेत. त्यामुळे अशी टोकन फी परत न करणाऱ्या यात्रा कमिट्यांवरकारवाई झाली पाहिजे आणि ग्रामदैवताची रीतसर यात्रा असणार्‍या गावांनाच शर्यतींची परवानगी दिली पाहिजे.

टोकन फी परत न देणार्‍या यात्रा कमिटी यांना जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील बैलगाडा मालक राकेश खैरे, बबनराव दांगट, नीलेश काळे, रांजणगाव येथील बैलगाडामालक संपत खेडकर, सर्जेराव खेडकर, काठापूर येथील रोशनकुमार करंडे, मंचर येथील धोंडीभाऊ शेटे, पिंपळगाव येथील बैलगाडामालक दीपक पोखरकर, खेड तालुक्यातील बैलगाडा मालक नवनाथ होले आणि विकास नायकोडी यांनी केला आहे.

गावातील काही लोक देवाच्या नावाखाली यात्रा भरवून पैसे कमवू लागले आहेत. त्यामुळे या लोकांवर नियंत्रण येण्यासाठी प्रशासनाने परवानगी देत असताना टोकन फी परत देणार्‍या यात्रा कमिट्यांनाच व ग्रामदैवताची रीतसर यात्रा असणार्‍या गावांनाच यात्रेची परवानगी द्यावी.
                             – जयसिंगशेठ एरंडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा बैलगाडा संघटना

Back to top button