पुणे : खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणारा जेरबंद | पुढारी

पुणे : खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणारा जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खरेदीच्या बहाण्याने सराफ पेढीत आल्यानंतर दोन सोनसाखळी व लॉकेट चोरी करून फरार झालेल्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी औंध परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले 1 लाख 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उपकारसिंग नांदलसिंग (वय 30, रा.औंध, मूळ, अमृतसर, पंजाब) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

फिर्यादी पांडुरंग मोरे यांची थिटे वस्ती, खराडी येथे गणेश ज्वेलर्स नावाची सराफ पेढी आहे. आरोपी त्यांच्या पेढीत खरेदीच्या बहाण्याने आला होता. त्याने त्यांच्याकडे दोन सोनसाखळीची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी हे सोनसाखळी व लॉकेट दाखवत असतानात्याने चोरी केली. त्यानंतर तो फरारी होता. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिस कर्मचारी नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांना उपकारसिंग याने चोरी केली असून, तो औंध परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला पकडून चोरीचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, कर्मचारी अविनाश संकपाळ, सुहास निगडे, महेश नानेकर, सूरज जाधव, गणेश हांडगर यांच्या पथकाने केली.

तोतया पोलिसांनी तरुणाला लुटले
शनिवारवाडा परिसरात पादचारी तरुणाला पोलिस असल्याच्या बतावणीने धमकावून त्याच्याकडून 15 हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरटा इरफान सय्यद आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल भीमराव खंदारे (वय 23, रा. तोफखाना, शिवाजीनगर) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सय्यद आणि साथीदारांनी खंदारेला अडवून पोलिस असल्याची बतावणी केली. सय्यदने त्याला बनावट ओळखपत्र दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. खंदारे यांना धमकावून सय्यदने ऑनलाइन पद्धतीने 15 हजार रुपये खात्यात हस्तांतरित केले. खंदारेनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत.

Back to top button